...अन् झळकला आत्मविश्वास
By admin | Published: August 4, 2014 12:55 AM2014-08-04T00:55:26+5:302014-08-04T00:55:26+5:30
श्रद्धानंदपेठ येथील श्रद्धानंद अनाथालयातील मुलींमध्ये रविवारी आत्मविश्वास झळकत होता. त्यांचे डोळे सांगत होते की त्यांच्यात पण दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, हावभाव सांगत होते की
श्रद्धानंद अनाथालयातील प्रदर्शन : मुलींमधील सुप्त गुणांना मिळाला वाव
नागपूर : श्रद्धानंदपेठ येथील श्रद्धानंद अनाथालयातील मुलींमध्ये रविवारी आत्मविश्वास झळकत होता. त्यांचे डोळे सांगत होते की त्यांच्यात पण दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, हावभाव सांगत होते की त्यांच्यातदेखील एक चांगला कलाकार दडला आहे अन् त्यांची कृती स्पष्ट करत होती की जर संधी मिळाली तर त्यादेखील आपली कला जगासमोर सुंदरपणे मांडू शकतात. रविवारी अनाथालयाच्यावतीने येथील मुलींनी स्वत:च्या हातांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद तर दिलाच, शिवाय मुलींच्या कलाकौशल्याचे भरभरून कौतुकदेखील केले.
रविवारी महापौर अनिल सोले यांच्या हस्ते या एक दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. अनाथालयातील १२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलींनी तयार केलेल्या निरनिराळ्या गृहोपयोगी तसेच सजावटीच्या वस्तू यात मांडण्यात आल्या होत्या. मुलींना प्रोत्साहन देणे हा आमचा सतत प्रयत्न असतो. त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रकाशात आणणे या उद्देशातून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती संस्थेच्या सहसचिव गीतांजली बुटी यांनी दिली.
समाजातील भावंडांसाठी राख्या
अनाथालयातील मुलींनी समाजातील भावंडांसाठी तयार केलेल्या सुंदर राख्यादेखील प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. १२ ते १५ मुलींनी तयार केलेल्या या राख्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून निरनिराळ्या घरात जातील व समाजातील भावंडांच्या हातावर बांधल्या जातील याचे समाधान राहील, अशी बोलकी प्रतिक्रिया या मुलींनी व्यक्त केली. याशिवाय स्वत:च्या हाताने रेखाटलेल्या सुरेख डिझाईन्स अन् आकर्षक रंगसंगती असलेली शुभेच्छापत्रेदेखील ठेवण्यात आली होती. अनाथालयातील मुलींनी तयार केलेले लहान मुलांचे स्वेटर्स, कॅन्डलचे सुशोभित काम याचे उपस्थितांनी कौतुक केले. याशिवाय मातीचे फ्लॉवर पॉट, कागदापासून तयार केलेली शोभिवंत फुलेदेखील लक्ष वेधून घेत होती.
‘इकोफ्रेंडली’ वस्तूंवर भर
श्रद्धानंद अनाथालयातील या मुलींनी निरनिराळ्या वस्तू तयार करताना त्या ‘इकोफ्रेंडली’ ठेवण्यावर जास्त भर दिला. यात शुभेच्छापत्रे, टाकावू कागदापासून तयार केलेली पाकिटे, शोभिवंत पोस्टर्स, वॉलहँगिंग्ज यांचा समावेश होता.