अन् ती नातेवाईकांत पोहचली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:21 AM2019-07-02T00:21:28+5:302019-07-02T00:22:29+5:30
नातेवाईक तिचा शोध घेत होते, तर पोलीस तिच्या नातेवाईकांचा! अखेर पोलिसांना तिच्या नातेवाईकांचा पत्ता कळला अन् २४ तासांपासून नातेवाईकांपासून दुरावल्याने प्रचंड अस्वस्थ असलेली ‘ती’ तिच्या नातेवाईकांमध्ये सुखरूप पोहचली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नातेवाईक तिचा शोध घेत होते, तर पोलीस तिच्या नातेवाईकांचा! अखेर पोलिसांना तिच्या नातेवाईकांचा पत्ता कळला अन् २४ तासांपासून नातेवाईकांपासून दुरावल्याने प्रचंड अस्वस्थ असलेली ‘ती’ तिच्या नातेवाईकांमध्ये सुखरूप पोहचली.
मुन्नी ऊर्फ फातिमा बी अब्दुल अजिज असे तिचे नाव. २७ वर्षीय मुन्नी यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंदनलाल गुप्ता नगरातील रहिवासी. रविवारी, ३० जूनला ती घरून निघाली अन् घरचा रस्ता विसरल्याने भटकत भटकत मानकापुरात आली. कावऱ्याबावºया अवस्थेतील मुन्नीकडे कर्तव्यावरील पोलिसांचे लक्ष गेले. त्यांनी तिला मानकापूर ठाण्यात आणले. तिची पोलीस आस्थेने चौकशी करू लागले. पुरती भांबावलेली ती, आपले नाव मुन्नी ऊर्फ फातिमा बी आहे, एवढेच सांगत होती. तिला घराचा पत्ता आठवत नव्हता. नातेवाईकांचीही नावे आठवत नव्हती. मानकापूर पोलिसांनी नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून एक महिला सापडल्याची, मुन्नीच्या वर्णनासह माहिती दिली. शिवाय शहरातील कुण्या पोलीस ठाण्यात नमूद वर्णनाच्या महिलेची हरविल्याबाबत नोंद आहे काय, त्याचीही चौकशी केली. मात्र, कोणत्याही पोलीस ठाण्यात रविवारी रात्रीपर्यंत तशी नोंद झाली नव्हती. त्यामुळे मुन्नीचे नातेवाईक शोधून काढण्यासाठी मानकापूर पोलीस प्रयत्न करू लागले. दरम्यान, सोमवारी सकाळी पोलीस वैद्यकीय तपासणीसाठी मुन्नीला मेयोत घेऊन गेले.
तिकडे मुन्नी रविवारपासून बेपत्ता झाल्याने तिचे अस्वस्थ नातेवाईक तिचा इकडे-तिकडे शोध घेऊ लागले. मुन्नीचा कुठेच पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारी यशोधरानगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. हा संदेश मानकापूर पोलिसांना सोमवारी सकाळी मिळाला आणि बेपत्ता महिलेशी मुन्नीचे वर्णन जुळत असल्याने मानकापूर पोलिसांनी मुन्नीचे कुंदनलाल गुप्तानगरातील घर गाठले. तेथे तिचा भाऊ मोहम्मद आसिफ अब्दुल अजिज (वय २८) याला हरविलेल्या मुन्नीचा मोबाईलमधून फोटो दाखविला. त्याने मुन्नी आपलीच बहीण असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याला नातेवाईकांसह यशोधरानगर पोलीस ठाण्यात बोलवून घेण्यात आले. तेथे मुन्नीला तिच्या भावाच्या हवाली करण्यात आले. ठाणेदार वजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नायक शिपाई वैशाली मोहोड, हवालदार सुनील मिलमिले आणि अनिल मिश्रा यांनी ही प्रशंसनीय कामगिरी बजावली.