...अन् शिवसेना नेते दानवे निघाले शिंदे गटाच्या कार्यालयाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 08:04 PM2022-12-19T20:04:11+5:302022-12-19T20:07:20+5:30

Nagpur News ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे कार्यकर्त्यांच्या गराड्यात शिवसेना कार्यालयात (शिंदे गटाच्या) जायला निघाले. मात्र, वेळीच कुजबुज झाली अन् त्यांनी ‘दाये मूड’चा पवित्रा घेतला.

...and Shiv Sena leader Danve left for the office of the Shinde group | ...अन् शिवसेना नेते दानवे निघाले शिंदे गटाच्या कार्यालयाकडे

...अन् शिवसेना नेते दानवे निघाले शिंदे गटाच्या कार्यालयाकडे

Next
ठळक मुद्देकार्यालयानेही अनुभवले निष्ठा अन् फोटो बदल, हे आपले नव्हे, त्यांचे कार्यालय ! पहिल्याच दिवशी शिंदे गटाकडून शह

 

नरेश डोंगरे !

नागपूर : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून एकमेकांना शह-काटशह देण्याचा कुठलीही संधी सोडली जात नाही. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ परिसरातील आधीच्या जागी असणारे शिवसेना कार्यालय कुणाचे? या प्रश्नावरून वाद झाला अन् अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाने त्याला आपले करून त्यात सोफे खुर्च्या, महापुरुषांसोबतच आपल्या नेत्यांचे फोटोही बसवून घेतले. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे कार्यकर्त्यांच्या गराड्यात शिवसेना कार्यालयात (शिंदे गटाच्या) जायला निघाले. मात्र, वेळीच कुजबुज झाली अन् त्यांनी ‘दाये मूड’चा पवित्रा घेतला.

नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान दरवेळी शिवसेनेचे कार्यालय भाजपा कार्यालयाच्या बाजूला अर्थात विधानसभेच्या पायऱ्यापुढे (पूर्वेला) असते. याही वेळेला तीच जागा, तेच कार्यालय मिळावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने रेटून धरली होती. मात्र, सत्तेपुढे काही (शहाणपण!) चालत नाही, त्याचा प्रत्यय देत शिवसेनेच्या शिंदे गटाला हे कार्यालय मिळाले. दुपारी १ वाजता येथे शिंदे गटाचे स्थिरस्थावर झाले. कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचा फोटो काढून त्या ठिकाणी आनंद दिघे यांचा फोटो लावण्याची तयारी सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या दोन्ही बाजूला (पुष्पमाला घालण्यासाठी) खिळे ठोकण्यात आले. याचवेळी विधिमंडळाच्या सभागृहाच्या दक्षिण द्वाराजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाजूला शिवसेनेच्या ठाकरे गटाला जागा देण्यात आली. तेथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नवीन सोफे, खुर्च्या मागवून घेतल्या. आपल्या नेत्यांचे फोटो आणि नेत्यांच्या नावाच्या पाट्याही बोलविल्या. इकडे हा पसारा असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहातून बाहेर आले आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे आधीच्या जागेवर असलेल्या शिवसेना (शिंदे गटाच्या) कार्यालयाकडे निघाले. झपझप पावलं टाकत ते पुढे जात असताना एका कार्यकर्त्याने त्यांना ‘हे आपले नव्हे, त्यांचे कार्यालय आहे,’ असे लक्षात आणून दिले आणि दानवेंनी त्याचक्षणी ‘दाये मूड’चा पवित्रा घेत आपले कार्यालय गाठले.

महाराजांचा पुतळाही आणला

ज्या ठिकाणी शिंदे गटाने कार्यालय थाटले तेथून ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा फोटो आपल्या कार्यालयात आणला. त्याचवेळी तेथून छत्रपती शिवाजी महाराजांचा आकर्षक असा अर्धाकृती पुतळाही आपल्या कार्यालयात आणला. अशा प्रकारे शिवसेनेत फूट पडल्यानंतर नेते, कार्यकर्ते अन् सर्वसामान्य व्यक्तींसोबतच शिवसेनेच्या कार्यालयानेही आज बदलाचा नवीन अनुभव घेतला.

पक्ष प्रमुख आले तरी...

पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सायंकाळी ४.४५ वाजता नागपूर एअरपोर्टवर दाखल झाले. मात्र, विधिमंडळ परिसरातील त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात सारे कसे अस्ताव्यस्तच होते. नेत्यांच्या नावाच्या पाट्या बसविणे, फोटो लावणे, खुर्च्या, सोफे सेट करणे, साफसफाई करण्याचे काम सायंकाळी ५ पर्यंत सुरूच होते.

----

Web Title: ...and Shiv Sena leader Danve left for the office of the Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.