अन् परतला चेहऱ्यावर आनंद ! : अमेरिकेच्या डॉक्टरांनी यशस्वी केल्या शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:10 AM2020-01-14T00:10:52+5:302020-01-14T00:12:51+5:30
जैन क्लब व भारतीय जैन संघटनेच्यावतीने नि:शुल्क ‘प्लास्टिक सर्जरी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. अमेरिकेच्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रिया यशस्वी करताच, अनेकांच्या चेहऱ्यांवर आंनद पसरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुभंगलेले ओठ, कापलेले कान, गालावरील काळा डाग यासारख्या विद्रुपतेला चेहऱ्यावर घेऊन जगताना जीवाची फार तगमग होते. पाहणाऱ्यांच्या बोचणाऱ्या नजरेला सामोरे जावे लागते. यावर शस्त्रक्रिया हाच उपाय. परंतु शस्त्रक्रियेसाठी येणारा साधारण लाख रुपयांपर्यंतचा खर्च अनेकांना पेलवत नाही. याची गंभीरता ओळखून जैन क्लब व भारतीय जैन संघटनेच्यावतीने नि:शुल्क ‘प्लास्टिक सर्जरी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. अमेरिकेच्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रिया यशस्वी करताच, अनेकांच्या चेहऱ्यांवर आंनद पसरला.
मनोहरलाल ढ्ढ्ढा यांच्या स्मृतिनिमित्त पारडी येथील भवानी हॉस्पिटलमध्ये आयोजित या दोन दिवसीय शिबिराला शांतादेवी मनोहरलाल ढ्ढ्ढा, अनिश छाजेड व सावन भटेवरा कुटुंबाचे, टॉपवर्थ ग्रुपचे व वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे विशेष सहकार्य मिळाले.
शिबिराचे उद्घाटन सोमवारी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, गो गॅसचे प्रमुख नितीन खारा, वर्धमान बँकेचे अध्यक्ष अनिल पारख, टॉपवर्थ ग्रुपचे संचालक सुरेंद्र लोढा, उपमहापौर मनिषा कोठे, भवानी हॉस्पिटलचे अध्यक्ष पांडुरंग मेहर, सचिव नितीन अरसापुरे, जैन क्लब अध्यक्ष डॉ. सुनील पारख, सचिव राजन ढ्ढ्ढा व समाजसेवक शरद बागडी प्रामुख्याने उपस्थित होते.
महापौर जोशी म्हणाले, अशा शिबिरातून समाजसेवेला बळ मिळते. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे. पुढील वर्षी या आयोजनात महानगर पालिकेचाही सहभाग असेल, असे आश्वासन देत त्यांनी जैन क्लब व भारतीय जैन संघटनेच्या सामाजिक कार्याचे कौतुकही केले. यावेळी आ. खोपडे, आ. मते व नितीन खारा यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक सुनील पारख यांनी केले. जैन क्लबच्या मदतीने गेल्या चार वर्षांपासून हे नि:शुल्क कार्य सुरू असल्याचेही ते म्हणाले. संचालन रजनीश जैन यांनी केले तर आभार सचिव राजन ढ्ढ्ढा यांनी मानले.
पहिल्याच दिवशी १८०० वर रुग्णांची नोंदणी
जैन क्लबचे जनसंपर्क अधिकारी अतुल कोटेचा यांनी सांगितले, पहिल्याच दिवशी १८०० वर रुग्णांची नोंदणी झाली. या रुग्णांवर अमेरिकेचे प्लास्टिक सर्जन डॉ. लॉरी बिस्टॉन, भवानी हॉस्पिटलचे डॉ. अमोल पटेल, मुकेश हटवार, संगीता बिजलानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रियेद्वारे चेहऱ्यावरील विद्रुपता दूर केली. मंगळवार १४ जानेवारी रोजीसुद्धा उर्वरित शस्त्रक्रिया पूर्ण केल्या जातील.
विदर्भासोबतच अन्य राज्यातून आले रुग्ण
विदर्भच नाही तर छत्तीसगड, मध्य प्रदेशसह आजूबाजूच्या राज्यातून मोठ्या संख्येत रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यासाठी या राज्यात प्रचार करण्यात आला होता. आयोजकांकडून रुग्णासोबतच त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी कौतुक केले.
यांनी दिली सेवा
शिबिराच्या आयोजनात शिबिराचे संयोजक सुभाष कोटेचा, शैलेश लश्करे, हेमेन्द्र बदानी, राजय सुराणा, संजय नाहटा, संतोष गेल्डा, धीरज मालू, शैलेंद्र मरोठी, मनीष छल्लाणी, प्रमोद तातेड, सुधीर सुराणा, अनिश छाजेड, हर्षित भन्साली, नरेश भरुट, नागेश आसानी, गौतम कोठारी, विनोद कोचर, प्रमोद कांकरिया, रमेश कोचर आदींनी आपली सेवा दिली.