अन् ते गदगद झाले...! चोरीला गेलेला ८४ लाखांचा ऐवज केला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:29 AM2019-01-05T00:29:47+5:302019-01-05T00:32:16+5:30
काटकसर करून, पै-पैसा जोडून दागिने बनविले होते. एका झटक्यात ते चोरीला गेले. त्यामुळे खूप दु:ख झाले होते. अनेक दिवस झोपच आली नव्हती. दिवस गेले अन् चोरट्यांनी नेलेल्या दागिन्यांची आसही मावळली मात्र तुमचे दागिने सापडले ते तुम्हाला परत दिले जाणार आहे, असा पोलिसांकडून निरोप मिळाला. ते ऐकून कानावर विश्वासच बसत नव्हता. आज आपले दागिने आपल्या हातात पडले. हा आनंद शब्दातीत आहे, अशी प्रतिक्रिया संबंधितांनी नोंदवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटकसर करून, पै-पैसा जोडून दागिने बनविले होते. एका झटक्यात ते चोरीला गेले. त्यामुळे खूप दु:ख झाले होते. अनेक दिवस झोपच आली नव्हती. दिवस गेले अन् चोरट्यांनी नेलेल्या दागिन्यांची आसही मावळली मात्र तुमचे दागिने सापडले ते तुम्हाला परत दिले जाणार आहे, असा पोलिसांकडून निरोप मिळाला. ते ऐकून कानावर विश्वासच बसत नव्हता. आज आपले दागिने आपल्या हातात पडले. हा आनंद शब्दातीत आहे, अशी प्रतिक्रिया संबंधितांनी नोंदवली.
शहरातील ३० पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या चोरी, घरफोडी, जबरी चोरी, लुटमार आदी घटनांमध्ये ज्या गुन्ह्यांचा छडा लागला आणि ज्या गुन्ह्यातील ऐवज पोलिसांनी जप्त केला. तो ऐवज ज्याचा त्यांना परत करण्याची कल्पना पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी महिनाभरापूर्वी परिमंडळ निहाय बैठकीत मांडली होती. त्यासंबंधाने न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी. प्रत्येक पोलीस ठाण्यात संबंधितांना तशा सूचना करून त्यांच्याकडून चीजवस्तू, दागिने परत मिळण्यासंबंधी फक्त अर्ज घ्यावा. नंतरची सर्व कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी पार पाडावी, असेही ठाणेदारांना कळविण्यात आले होते. त्यानुसार, महिनाभरात ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यानंतर संबंधितांना पत्र देऊन तुमचा मुद्देमाल ४ जानेवारीला तुम्हाला पोलीस आयुक्तालयात परत मिळणार आहे, अशी सूचनाही करण्यात आली होती.
त्यानुसार, पोलीस आयुक्तालयातील हिरवळीवर आज एका कार्यक्रमाचे दुपारी ४ वाजता आयोजन करण्यात आले होते. चोरीला गेलेला आपला मुद्देमाल परत घेण्यासाठी २२१ महिला-पुरुष तेथे जमले. पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय, सहआयुक्त कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांच्या हस्ते संबंधितांना त्यांचे दागिने आणि इतर मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त, सहआयुक्तांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शहरातील बहुतांश उपायुक्त, सहायक आयुक्त आणि काही ठाणेदार उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी केले
त्या चोराचे आभार : पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय
चोरलेला माल ज्यांचा त्यांना परत करण्याची कल्पना कशी सुचली ते स्पष्ट करताना पोलीस आयुक्तांनी त्यांचा स्वत:चा एक अनुभव कथन केला. ते म्हणाले, मी पोलीस दलात आल्यानंतर पंढरपूर येथे रुजू व्हायला निघालो. बॅगमध्ये सर्व प्रमाणपत्रे आणि एक ब्लँकेट होते. प्रवासात चोरट्याने ती बॅग लंपास केली. मी अस्वस्थ झालो. सर्व महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्रे कशी परत मिळणार, अशा विचारात असतानाच मला एक कुरिअर मिळाले. चोरट्याने माझी सर्वच्या सर्व कागदपत्रे परत पाठविली होती. पत्नीने मोठ्या प्रेमाने दिलेले ब्लँकेट मात्र चोरट्याने ठेवून घेतले होते, अशी मिश्कील आठवण सांगून त्यांनी उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या.
ती भावना खूप महत्त्वाची : उपायुक्त पोद्दार
यावेळी पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांनीही आपली भावना व्यक्त केली. रुग्णालयात तपासणीसाठी आलेले उपायुक्त पोद्दार यांची हिरेजडित अंगठी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने लंपास केली होती. ही त्यांची एंगेजमेंट रिंग होती. त्यामुळे ती चोरीला गेल्याने अपण खूप अस्वस्थ झालो होतो. मात्र ती परत मिळाल्यानंतर जो आनंद झाला, ते शब्दात सांगणे कठीण आहे, असेही उपायुक्त पोद्दार म्हणाले.
पीडित : २२१ ; एकूण चीजवस्तू : २५५
(रोख, विविध प्रकारचे दागिने, मोबाईल आणि वाहने) किंमत : ८४ लाख ५१ हजार २२६ रुपये