आणि विश्वविक्रम झाला!
By Admin | Published: February 19, 2016 02:58 AM2016-02-19T02:58:54+5:302016-02-19T02:58:54+5:30
महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या सभागृहात साऱ्यांचेच श्वास रोखलेले...फक्त एक मिनिट आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड...या क्षणाचे
नागपूर : महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या सभागृहात साऱ्यांचेच श्वास रोखलेले...फक्त एक मिनिट आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड...या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागपूरकर उत्सुक होते...दुपारचे ३ वाजून ४५ मिनिट झाले आणि नागपूरकर गिटारवादक राकेश वानखेडेने गिटारच्या तारा छेडल्या. प्रचंड गतीने वादन करीत एका मिनिटात ६६० नोट्स त्याने लीलया गिटारवर उतरविल्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. एका मिनिटात एक इतिहास रचला गेला होता. नागपूरकरांच्या नावे गुरुवारी एक विश्वविक्रम नोंदला गेला होता.
साधारणत: विश्वविक्रम म्हणजे जास्तीतजास्त वेळ वादन, गायन केले जाते. पण केवळ एक मिनिट आणि संगीतातील ६६० नोट्स वाजविणे कसे शक्य आहे, असे अनेकांना वाटले. याबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असल्याने राकेशच्या या विश्वविक्रमासाठी त्याचे मित्र, आई-वडील आणि नागपूरकर रसिक, कलावंत प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी राकेशने एका स्ट्रींगमध्ये ४४ याप्रमाणे १५ वेळा वादन करताना एकूण ६६० नोट्स एका मिनिटात पूर्ण केले. काही समजण्यापूर्वीच विश्वविक्रम झाला होता. ही जादू राकेशच्या रियाजाची आणि बोटांची होती. एका मिनिटात ६६० नोट्स वाजविल्यावर सभागृहात सर्वांनीच आनंद व्यक्त करीत जल्लोष केला. २००४ साली राकेशने गिटार हातात घेतली. तो संजय गाडे यांच्याकडे गिटार शिकतो. रिदम इन्स्ट्रुमेन्ट, ट्रम्पेट अशी काही वाद्येही तो वाजवितो पण गिटारवादनात मला जास्त आनंद मिळतो, असे तो म्हणाला. काहीतरी वेगळे करायचे म्हणून एक झपाटलेपण होते. त्यात फास्टेस्ट गिटारवादन करीत कमी वेळात अधिकाधिक नोट्स वाजविण्याचा विचार माझ्या मनात आला. खरे तर एका मिनिटात ७०० पेक्षा जास्त नोट्स वाजविण्याची तयारी मी केली होती. पण ६६० नोट्सपर्यंत मला यश मिळविता आले. गिटार हे मुळात पाश्चात्त्य वाद्य आहे पण पाश्चिमात्य संगीतासह भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत वाजविण्याचा प्रयत्न राकेश करतो आहे. त्यात तो यशस्वीही होतो आहे. राकेशने त्याचा विश्वविक्रम पूर्ण केल्यावर त्याचे मित्र आणि चाहत्यांनी त्याला फुलांचे गुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले. याप्रसंगी इंडिया बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डच्या वरिष्ठ परीक्षक सुनीता धोटे यांनी राकेशला प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्याच्या या विश्वविक्रमाची नोंद केली. याप्रसंगी सभागृहात उत्साहाचे वातावरण होते. (प्रतिनिधी)
नागपूरकरांतर्फे राकेशचा सत्कार
राकेश वानखेडेने गिटारवादनाचा विश्वविक्रम पूर्ण केल्यावर नागपूरकरांतर्फे त्याचा सत्कार महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अलाहाबाद बँकेचे मुरली क्रिष्णा, आर. के. मिश्रा, गजेन्द्र भवरे, सुनीता धोटे, धनंजय लानकर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सर्वच अतिथींनी राकेशचे अभिनंदन केले.
आज समाधान वाटते आहे
विश्वविक्रम करण्याचे माझे एक स्वप्न आज पूर्ण झाले. हा आनंद मला शब्दात व्यक्त करता येणे शक्य नाही. लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यात मी यश मिळवू शकेल असे मला वाटले नव्हते. पण आज हे यश मिळविताना खूप समाधानी आहे. या विश्वविक्रमासाठी गेले दोन वर्षे मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. यानंतर एका मिनिटात एक हजार नोट्स वाजविण्याचा माझा प्रयत्न असेल.
- राकेश वानखेडे, गिटारवादक