नागपुरातील आंध्रा बँकेत कर्ज घोटाळा : बँकेची महिला अधिकारी सूत्रधार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:34 PM2019-07-11T23:34:24+5:302019-07-11T23:35:06+5:30

बँकेच्या महिला अधिकाऱ्याने दलालांना हाताशी धरून आंध्रा बँकेच्या इतवारी शाखेत लाखोंचा कर्ज घोटाळा केल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुरुवारी बँकेच्या एका अधिकारी महिलेसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Andhra Bank bank loan scam:Bank's woman official main accused ? | नागपुरातील आंध्रा बँकेत कर्ज घोटाळा : बँकेची महिला अधिकारी सूत्रधार?

नागपुरातील आंध्रा बँकेत कर्ज घोटाळा : बँकेची महिला अधिकारी सूत्रधार?

googlenewsNext
ठळक मुद्देकागदपत्रे एकाची, कर्ज उचलले दुसऱ्याने : कर्ज वसुलीसाठी भलत्याकडेच तगादा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँकेच्या महिला अधिकाऱ्याने दलालांना हाताशी धरून आंध्रा बँकेच्या इतवारी शाखेत लाखोंचा कर्ज घोटाळा केल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुरुवारी बँकेच्या एका अधिकारी महिलेसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अनघा निखिल भुसारी (वय ३४, रा. प्रसादनगर, जयताळा), अमोल रविकिरण कुंभारे (रा. हसनबाग) आणि मंगेश रंजित जगताप (रा. रचना युतिका अपार्टमेंट) अशी आरोपींची नावे आहेत. यातील अनघा भुसारी ही आंध्रा बँकेच्या इतवारी शाखेत सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तीच या कर्ज घोटाळ्याची सूत्रधार असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट २०१७ ते १५ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत आरोपी अनघा भुसारी, अमोल कुंभारे आणि मंगेश जगताप या तिघांनी हा घोटाळा केला.
कर्जासाठी गरजू मंडळींकडून कागदपत्रे गोळा करायची. काही दिवसांनी तुमचे कर्जप्रकरण नामंजूर झाले असे सांगून त्यांना गप्प करायचे. त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून भलत्याच व्यक्तीला ती कागदपत्र असलेली व्यक्ती म्हणून दर्शवायचे आणि बनावट कागदपत्रांच्या, नोंदीच्या आधारे लाखोंचे कर्ज उचलायचे, अशी या टोळीची कार्यपद्धती होती. त्यांनी अशा प्रकारे आंध्रा बँकेच्या इतवारी शाखेत आनंद निंबाजी तुपे (वय ३४, रा. खामला) यांच्या नावावर ३५ लाखांचे कर्ज उचलले.
अशाच प्रकारे अन्य काही व्यक्तींच्या नावानेही आरोपींनी लाखोंचे कर्ज उचलले. दरम्यान, थकीत कर्जाची परतफेड होत नसल्याने वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू झाली. बँकेच्या रेकॉर्डनुसार कर्जदार असलेल्या खामल्यातील आनंद तुपे यांच्याशी बँक प्रशासनाने संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला कवडीचे कर्ज मिळाले नाही, असे सांगितले. त्यानंतर हा कर्ज घोटाळा उजेडात आला. प्रदीर्घ चौकशीनंतर बँक अधिकाऱ्यांनी तुपेंकडून लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. तूर्त या प्रकरणात कुणालाही अटक झाली नाही, असे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी सांगितले.
अनेक शाखांमध्ये घोळ
आरोपींनी केवळ माणसे (कर्जदार) आणि त्यांची कागदपत्रेच बदलवली नाही तर, विविध भागात विविध वाहनांचे कागदोपत्री शोरूमही तयार केले. आरटीओच्या नावाने वाहनाचे बनावट दस्तावेज तयार केले. त्याआधारे इतवारी शाखेतच नव्हे तर आरोपींनी आंध्रा बँकेच्या मानेवाडा, बोखारा शाखेतूनही गृह कर्ज, वाहन कर्ज आणि मुद्रा कर्ज उचलले आहे. या टोळीत अनेकांचा समावेश असावा, असा संशय आहे. घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता त्याचा तपास गुन्हे आर्थिक शाखेकडे जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

 

Web Title: Andhra Bank bank loan scam:Bank's woman official main accused ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.