आंध्र प्रदेशातील व्यापारी कुटुंबाने १८.५५ लाखांनी फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 09:16 PM2019-09-20T21:16:58+5:302019-09-20T21:18:07+5:30
वातानुकूलित उपकरणाची (एसी) विक्री करणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका व्यापारी कुटुंबाने नागपुरातील व्यापाऱ्याला १८ लाख ५५ हजारांचा गंडा घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वातानुकूलित उपकरणाची (एसी) विक्री करणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका व्यापारी कुटुंबाने नागपुरातील व्यापाऱ्याला १८ लाख ५५ हजारांचा गंडा घातला. मोहम्मद अहमद, मोहम्मद साजिया, मोहम्मद चांद पाशा, जमिनल बानो मोहम्मद, मोहम्मद नाजिया मोहम्मद रियाज अशी आरोपींची नावे आहेत. ते सर्व एसी गार्ड हैद्राबाद (विजयवाडा) आंध्र प्रदेश येथील रहिवासी आहेत.
विनोद चिंतामण हेडावू (वय २९) यांचे मॉडल मिल चौकात माँ बम्लेश्वरी इलेक्ट्रॉनिक्स नावाने दुकान आहे. २० एप्रिलला हेडावूने आरोपींकडे ८० नग एसीची मागणी नोंदवली. त्यासाठी ३३ लाख ७५ हजार रुपये आरोपींना दिले. रक्कम दिल्यानंतर बराच पाठपुरावा केल्यानंतर आरोपींनी हेडावू यांच्याकडे ४५ नग एसी पाठविले. उर्वरित ३५ नग एसी पाठविलेच नाही. आपली रक्कम परत मागितली असता तीदेखील आरोपींनी दिली नाही. २७ एप्रिलला आरोपींनी हेडावू यांच्या नावाने बिल बनवून स्वत:च्या गाडीतील २५ एसी दुसऱ्याच इसमाला ८ लाखांत विकले. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर हेडावू यांनी आरोपींकडे विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. परिणामी हेडावू यांनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.