अंगणवाडी झाली गुरांचा गाेठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:09 AM2020-12-22T04:09:45+5:302020-12-22T04:09:45+5:30
बेलाेना : बेलाेना (ता. नरखेड) येथे एकूण आठ अंगणवाड्या असून, प्रत्येक अंगणवाडीला स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यात ...
बेलाेना : बेलाेना (ता. नरखेड) येथे एकूण आठ अंगणवाड्या असून, प्रत्येक अंगणवाडीला स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यात सहा अंगणवाड्यांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहेत. परंतु, हस्तांतरण प्रक्रियेस विलंब केला जात असल्याने त्या इमारतींचा वापर परिसरातील नागरिक गुरे बांधण्यासाठी अर्थात गाेठा म्हणून करीत आहेत.
यातील काही इमारतींचे बांधकाम पाच वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आले. यातील दाेन इमारतींचा वापर मुलांच्या शिक्षणासाठी केला जात आहे. तेव्हापासून आजवर या चार इमारतींची हस्तांतरण प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केली नाही. याकडे जिल्हा परिषद व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, असा आराेप नागरिकांनी केला आहे. उर्वरित चार इमारतींचे काम अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले असून, त्या इमारती धूळ खात पडल्या आहेत. अपूर्ण राहिलेले काम तातडीने पूर्ण करण्याची तसदीही प्रशासन घेत नाही. शिवाय, त्याचा पाठपुरावाही कुणी करीत नाही.
जिल्हा परिषद सदस्य मुलताईकर यांनी या इमारतींची नुकतीच पाहणी केली. अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करून त्या इमारतींच्या हस्तांतरण प्रक्रियेला वेग येण्यासाठी हा मुद्दा जिल्हा परिषद व संबंधित विभागाच्या बैठकीत उपस्थित केला जाणार असल्याचे मुलताईकर यांनी सांगितले. या अंगणवाड्यांच्या इमारतींचे बांधकाम याेग्य ठिकाणी करण्यात आले नाही. त्यामुळे गावातील मुलांना येण्या-जाण्यास त्रास हाेणार असल्याचेही काही पालकांनी सांगितले.
....
बांधकाम अपूर्ण
शून्य ते सहा वर्षांपर्यतच्या बालकांना सकस आहार मिळावा, त्यांच्या मनात शिक्षणाबाबत आवड निर्माण व्हावी या उदात्त हेतूने गावाेगावी अंगणवाड्यांची निर्मिती करण्यात आली. याच अंगणवाड्यांमध्ये बालकांसाेबत गराेदर मातांची तपासणी केली जात असून, त्यांना सकस आहाराचे वाटप केले जाते. बेलाेना येथील काही अंगणवाड्यांच्या इमारतींचे बांधकाम अपूर्ण असून, तिथे बालक व अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याच कारणामुळे हस्तांतरण प्रक्रिया थांबली असल्याचेही जाणकार व्यक्तींनी सांगितले.