अंगणवाडी साहित्य घोटाळा ; पोलिसात तक्रार दाखल
By गणेश हुड | Published: May 31, 2024 10:24 PM2024-05-31T22:24:33+5:302024-05-31T22:27:05+5:30
जि.प.अधिकाऱ्यांसह पुरवठादार अडचणीत.
नागपूर : अंगणवाडी साहित्य घोटाळाप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार पत्र दिले आहे. यामुळे महिला बाल कल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी, पंचायत समिती स्तरावरील सीडीपीओ यांच्यासह पुरवठादारांच्या अडचणी वाढल्या आहेत.
अंगणवाडी श्रेणीवर्धन योजनेंतर्गत अंगणवाड्यांमध्ये साहित्याचा पुरवठा करण्यासाठी दोन टप्प्यात १ कोटी ६ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला. हा सर्व निधी पंचायत समिती स्तरावरील सीडीपीओ यांच्या खात्यात वळता करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या ४९ अंगणवाड्यांना साहित्याचा पुरवठा करण्यापूर्वीच कंत्राटदाराने बील उचलून जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याने या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी जि.प.उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांना दिलेल्या पत्रातून केली होती. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त समितीच्या प्राथमिक अहवालात पुरवठादारांच्या नावाचा कुठेही उल्लेख करण्यात आला नव्हता. त्यामुळे राऊत यांनी सुधारित चौकशी अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सुधारित अहवालात अधिकाऱ्यांसह पुरवठादारांच्या नावांचा समावेश करण्यात आला.
तीन सदस्यीय चौकशी समितीने आपल्या अहवालात सीडीपीओसह अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला. पुरवठादारालाही दोषी धरत ८४ लाख रुपये वसुलीस पात्र असल्याचा अहवालात उल्लेख केला. या प्रकरणी आता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. हा संपूर्ण प्रकार ग्रामीण भागातील असल्याने पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्रार केली आहे. जि.प.प्रशासनाकडून पत्र मिळाल्याला त्यांनी दुजोरा दिला आहे.