सावित्रीमाईच्या वेशभूषेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची चटणी-भाकर आंदोलन
By निशांत वानखेडे | Published: January 3, 2024 08:28 PM2024-01-03T20:28:22+5:302024-01-03T20:28:34+5:30
संविधान चौकात अनोख्या पद्धतीने वेधले लक्ष: संपाला एक महिना पूर्ण.
नागपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यांना अनोखे अभिवादन केले. गेल्या महिनाभरापासून संप पुकारत संविधान चौकात आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी बुधवारी सावित्रीमाईंच्या वेशभूषेत सहभागी झाल्या व हातात चटणी-भाकर घेत लोकांचे लक्ष वेधले.
आयटकच्या बॅनरखाली राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबर २०२३ पासून संपावर आहेत. आंदाेलनाला आता महिना पूर्ण हाेत आहे. नागपूर जिल्ह्यातील कर्मचारी संपादरम्यान दरराेज संविधान चाैकात येऊन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिकांच्या मार्फत कर्मचाऱ्यांना नाेटीस बजावणे सुरू केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंताेष पसरला आहे. मात्र २६,००० मासिक वेतन व पेन्शन, गॅज्युटीची मागणी मान्य हाेईपर्यंत आंदाेलन मागे न घेण्याचा इशारा आयटकचे राज्य महासचिव श्याम काळे यांनी दिला आहे.
विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याशी चर्चा झाली पण ताेडगा निघाला नाही. नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली व बैठकीचे आश्वासन दिले पण पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे संप आणखी तीव्र करण्याची घाेषणा आंदाेलनकर्त्यांनी दिली आहे. बुधवारी आंदाेलनादरम्यान क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वनिता कापसे, ज्योती अंडरसहारे, उषा चारभे, जयर्श्री चांहादे, प्रीती राहुलकर, शालिनी पुरकर, अनिता गजभिये, वनिता भिवणकर, विद्या गजबे, विशाखा हाडके, स्मिता गजभिये, चंद्रप्रभा राजपूत, करूणा साखरे, आशा बोधलखंडे, रेखा कोहाड, विजया कश्यप, कल्पना शेवाळे, लता भड, सुंनदा भगत, सुनीता पाटील, शालिनी मुरारकर, मीना चवरे, प्रमिला चौधरी, कुमुद नवकरीया, आशा पाटील, छाया कडू, सुनीता मानकर, उषा सायरे, मंगला रंगारी, शीला लोखंडे, शैला काकडे, शीला पाटील व हजारो कार्यकर्ता हजर होत्या.