काेराेनाबाधित रुग्णांसाठी सरपंच ठरले देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:13 AM2021-05-05T04:13:44+5:302021-05-05T04:13:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : तालुक्यात काेराेनाचा प्रकाेप दिवसेंदिवस वाढत आहे. खेड्यापाड्यांतही काेराेनाबाधितांची संख्या वाढत असून, उपचारासाठी रुग्णांची माेठी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : तालुक्यात काेराेनाचा प्रकाेप दिवसेंदिवस वाढत आहे. खेड्यापाड्यांतही काेराेनाबाधितांची संख्या वाढत असून, उपचारासाठी रुग्णांची माेठी गैरसाेय हाेत आहे. तालुक्यातील काेथुळना परिसरात रुग्णांची संख्या वाढली असून, अनेकांना ऑक्सिजन बेड मिळत नव्हते. अशा बिकट परिस्थितीत काेथुळना येथील सरपंच हरीश चाैधरी रुग्णांसाठी देवदूत ठरले. स्वखर्चातून ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करून गाेरगरीब रुग्णांना उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांच्या या सेवाकार्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
काेथुळना गावासह लगतच्या खेड्यापाड्यातील नागरिक काेराेनामुळे हैराण झाले. रुग्णांना उपचाराकरिता बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी अक्षरश: भटकंती करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले. अशा बिकट परिस्थितीत सरपंच हरीश चाैधरी काेराेनाबाधित रुग्णांच्या मदतीला धावले. त्यांची पत्नी आशावर्कर असल्याने त्यांनी नागपुरात ऑक्सिजन सिलिंडर विक्रीस उपलब्ध असल्याची बाब सरपंच चाैधरी यांच्या कानावर टाकली. लगेच त्यांनी ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि स्वखर्चातून ते खरेदी केले. काेथुळना गावात ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा झाल्याने गाेरगरीब रुग्णांना आधार मिळाला आहे. गावस्तरावर कार्यरत असलेल्या आशावर्करच्या माध्यमातून परिसरातील खेड्यापाड्यातील गरजू रुग्णांनासुद्धा हे ऑक्सिजन सिलिंडर माेफत दिले जात असल्याचे सरपंच हरीश चाैधरी यांनी सांगितले.
...
महिलेच्या प्रकृतीत सुधारणा
काेथुळना येथील रहिवासी निर्मला शांताराम भिलकर (५५) ही महिला रक्तदाब व मधुमेहाच्या आजाराने त्रस्त हाेती. अशातच तिचा काेविड रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आला. सीटीस्कॅन स्काेअर १८ हाेता. अशात ऑक्सिजनची नितांत गरज हाेती. ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी धावाधाव झाली. कळमेश्वर येथे तिनदा ने-आण केल्यानंतर तिचा श्वसनाचा त्रास वाढला. रुग्णांची उपचारासाठी हाेणारी फरपट पाहता सरपंच हरीश चाैधरी यांनी स्वत:च ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केल्यानंतर अखेर महिलेला ऑक्सिजन मिळाल्याने तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. सरपंच हरीश चाैधरी यांच्या सेवाकार्याबद्दल पंचायत समितीच्या सभापती अरुणा शिंदे यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचे काैतुक केले.