देवदूत बनले पोलीस ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:17 AM2020-12-03T04:17:45+5:302020-12-03T04:17:45+5:30

नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वेळ पहाटे २ वाजताची... गणेशपेठ पोलिसांचे गस्तीवरील वाहन गांधीसागर तलावाच्या जवळून ...

Angels become cops () | देवदूत बनले पोलीस ()

देवदूत बनले पोलीस ()

googlenewsNext

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वेळ पहाटे २ वाजताची... गणेशपेठ पोलिसांचे गस्तीवरील वाहन गांधीसागर तलावाच्या जवळून जात असते... पोलिसांची चौकस नजर तलावाच्या कठड्यावर जाते अन पोलिसांच्या काळजात धस्स होते... एक तरुण कठड्यावर चढत असतो... पुढे काय होणार, त्याची पोलिसांना कल्पना येते... क्षणाचीही वेळ न दवडता वाहन थांबवून पोलीस त्याच्याकडे धडधडत्या काळजाने धाव घेतात... तो कठड्यावरून उडी घेणार तेवढ्यात त्याला पकडतात... तरुणाचे मानगूट आणि स्वेटर पोलिसांच्या हातात असते तर उर्वरित शरीर कठड्यावरून तलावाकडे लोंबकळत असते... पोलीस जिकरीने त्याला कठड्यावरून आपल्याकडे ओढतात अन् एकाला मृत्यूच्या दाढेतून ओढल्याचे समाधान लाभल्याने साऱ्याच पोलिसांचा जीव भांड्यात पडतो...

दरम्यान, आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेला तरुण पोलिसांशी वाद घालतो. पोलीस समंजसपणा दाखवत त्याला शांत करतात आणि गणेशपेठ पोलिस ठाण्यात घेऊन जातात. तेथे त्याची विचारपूस सुरू होते. नाव, पत्ता कळाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जातो. पहाटेच्या ३ वाजता धडधडत्या काळजाने कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचतात. काहीतरी विपरीत घडल्याचे त्यांच्याही लक्षात आले असते. आतमध्ये घडलेल्या प्रकाराची माहिती कळल्याने त्यांचेही अवसान गळते.

दरम्यान, आत्महत्या करण्याच्या इराद्याने घरून बाहेर पडलेल्या तरुणाचे त्याच्या कुटुंबातील सदस्यासोबत वाद असल्याचे कळाल्याने पोलीस त्याचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करतात. चुका लक्षात आल्यानंतर संबंधित तरुण आणि त्याचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात हमसून हमसून रडतात.

ऐनवेळी देवदूत बनून आलेल्या घरच्या कर्त्या व्यक्तीचा जीव वाचविणाऱ्या गणेशपेठ पोलिसांचे कसे आभार मानावेत, असा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. भळभळत्या डोळ्यांनी वारंवार हात जोडून, नतमस्तक होऊन हे कुटुंबीय देहबोलीतून कृतज्ञता व्यक्त करतात. नंतर भल्या सकाळी आपले घर गाठतात.

----

नेहमीची कटकट कारणीभूत!

सदर तरुण तीस वर्षाचा असून तो अंबाझरीतील टिळक नगरातील रहिवासी आहे. त्याचे चहा-नाश्ता सेंटर आहे. तेथे बऱ्यापैकी कमाई होते. मात्र त्यातील बरीचशी रक्कम तो आपल्या मित्रांवर (!) उडवतो. त्यामुळे त्याच्या घरात कुटुंबकलह निर्माण झाला होता. रोजच्या कटकटीमुळे तो त्रस्त झाला आणि त्याचमुळे मंगळवारी पहाटे त्याने गांधीसागर तलाव गाठला होता. तो कठड्यावरून उडी घेण्याच्या तयारीत होता. पाच- दहा क्षण उशीर झाला असता तर त्याचे जीवन संपले असते अन् त्याच्या कुटुंबीयांचा दुःखाच्या दरीत कडेलोट झाला असता. मात्र, गणेशपेठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक योगेश सानप, शिपाई तुषार, सुभाष, चंद्रशेखर आणि विनोद यांनी कमालीची स्फूर्ती दाखवत या तरुणाला पकडले आणि त्याचा जीव वाचवला.

Web Title: Angels become cops ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.