मृत राहुल आग्रेकरच्या कुटुंबीयांचा पोलिसांवर रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:35 PM2017-11-25T23:35:11+5:302017-11-25T23:42:15+5:30

घटनेला पाच दिवसांचा कालावधी होऊनही पोलिसांनी राहुल आग्रेकर(वय ३७)च्या अपहरण आणि हत्याकांडातील आरोपींना पकडले नाही. दुसरीकडे आमच्याकडे काम करणाऱ्यांना चौकशीच्या नावाखाली पोलीस मारहाण करीत आहेत, असा आरोप शोकसंतप्त सुरेश आग्रेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केला.

The anger of the deceased Rahul Agrekar's family on police investigation | मृत राहुल आग्रेकरच्या कुटुंबीयांचा पोलिसांवर रोष

मृत राहुल आग्रेकरच्या कुटुंबीयांचा पोलिसांवर रोष

Next
ठळक मुद्देमारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याची आणि तपासाला वेग देण्याची केली मागणी कुटुंबीयांची पत्रकार परिषद

आॅनलाईन लोकमत
नागपूर : घटनेला पाच दिवसांचा कालावधी होऊनही पोलिसांनी राहुल आग्रेकर(वय ३७)च्या अपहरण आणि हत्याकांडातील आरोपींना पकडले नाही. दुसरीकडे आमच्याकडे काम करणाऱ्यांना चौकशीच्या नावाखाली पोलीस मारहाण करीत आहेत, असा आरोप शोकसंतप्त सुरेश आग्रेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केला.
पाच दिवस होऊनही राहुलचे अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे आग्रेकर परिवार कमालीचा व्यथित आहे. त्यांनी आज सायंकाळी राहुलच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आपल्या वेदना मांडल्या.
राहुलचे वडील सुरेश आग्रेकर आणि मोठा भाऊ जयेश यांनी या घटनाक्रमाची सुरुवातीपासूनची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, राहुल नेहमी सकाळी १०.३० नंतरच घराबाहेर जायचा. घटनेच्या दिवशी मात्र तो सकाळी ८.३० वाजताच बाहेर पडला. पत्नी अर्पिता आणि आईशी बोलताना त्याने एक ते दीड तासात परत येतो ,असे सांगितल होते. आपण (सुरेश आग्रेकर) चुलत भावाची दुसऱ्या दिवशी तेरवी असल्यामुळे त्या तयारीत असल्याने राहुलसोबत बोलू शकलो नाही. बाहेर पडताना तो फोनवर कुणाशी तरी बोलत होता. दाराबाहेर चौकीदाराने त्याला कोणती गाडी नेणार, असे विचारले असता मी पायीच जातो, असे म्हणत राहुल पुढे गेला. समोरच्या दारोडकर चौकात पांढऱ्या रंगाची बोलेरो उभी होती. त्यात तो बसला आणि निघून गेला. १० वाजून ५४ मिनिटांनी पत्नी अर्पिताशी फोनवर बोलताना राहुलने आणखी एक ते दीड तास लागेल परत यायला, असे सांगितले. चार मिनिटानंतर राहुलने त्याच्या जैन लॉटरी एजन्सीच्या कार्यालयात फोन केला. त्यानंतर राहुलच्या मोबाईल नंबरवरून २ वाजून ८ मिनिटांनी जयेशच्या मोबाईलवर फोन आला. पलीकडून बोलणाऱ्या आरोपीने तुझा लहान भाऊ आमच्या ताब्यात आहे. जिवंत परत पाहिजे असेल तर एक तासाच्या आत कोराडी मंदिराजवळ एक कोटी रुपये घेऊन ये. तुला एकट्यालाच रक्कम घेऊन यायचे आहे, पोलिसांना माहिती दिल्यास गंभीर परिणाम होतील, असे म्हटले.
त्यावेळी सुरेश आग्रेकर नंदनवनमध्ये होते. त्यांना तातडीने बोलवून घेत जयेशने ही माहिती त्यांना, कुटुंबीय तसेच निकटस्थ व्यक्तींना दिली. ३.३० वाजेपर्यंत विचारविमर्श केल्यानंतर आम्ही काही जण लकडगंज ठाण्यात आणि काही जण गुन्हे शाखेत गेलो. तेथे अपहरण आणि खंडणीच्या मागणीची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. प्रत्यक्षदर्शींनी राहुलला एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरोत बसताना बघितल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपी बनावट नंबर प्लेट वापरून गुन्हा करतात, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करून बोलेरोचा क्रमांक मिळविण्याच्या नादात बराच वेळ गमावला. इकडे आरोपी खंडणीसाठी फोन करीत होते. पोलिसांनी वेळीच शहराबाहेर नाकाबंदी करून पांढऱ्या रंगाच्या बोलेरो शोधल्या असत्या किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला असता तर आरोपी तेव्हाच हाती लागले असते. पोलिसांनी ती तत्परता दाखवली नाही. गुन्हा घडल्यानंतर आता पाच दिवस होऊनही आरोपींना पकडले नाही. आरोपींचा शोध घेण्यासाठी तत्परता दाखवण्याऐवजी आमच्याकडे कर्मचारी असलेल्यांना पोलीस चौकशीच्या नावाखाली बोलवतात आणि त्यांना मारहाण करतात, असा आरोपही आग्रेकर पिता-पुत्राने केला. हा प्रकार निषेधार्ह असल्याचेही ते म्हणाले.

मोठा सुटला, छोट्याचा बळी
आरोपी दुर्गेश याने तीन आठवड्यांपूर्वीच अपहरणाचा कट रचला होता. त्यानुसार, त्याने जयेशची त्याच्या नोकराच्या माध्यमातून माहितीही काढली होती. आग्रेकर यांच्याकडे काम करणाऱ्या गुलशन वाघे याला तीन आठवड्यांपूर्वी दुर्गेशने एका बारमध्ये नेले होते. तेथे त्याला दारू पाजल्यानंतर त्याच्याकडून जयेश कधी काय करतो, याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर १५ नोव्हेंबरला तो जयेशच्या राज मेडिकलमध्ये आला. आपणास ६० ते ७० हजारांची औषधं घ्यायची आहे, असे सांगून दुर्गेशने जयेशला सोबत चलण्याचा हट्ट धरला. मात्र, जयेशने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. मी घरून गाडी आणि नोकराला सोबत घेतो, असे म्हणत जयेश घरी आला. त्यानंतर दुर्गेशची त्याने अर्धा तास वाट बघितली. मात्र, तो आला नाही. त्यावेळी त्याने जयेशला जो फोन नंबर दिला होता. तो लागतच नव्हता. यामुळे दुर्गेश त्याचवेळी जयेशचे अपहरण करणार होता, असे स्पष्ट झाले. मोठ्या भावाने प्रसंगावधान राखल्यामुळे तो बचावला. त्यामुळे आरोपींनी नंतर राहुलचा बळी घेतला.
पोलिसांकडून या गंभीर गुन्ह्यानंतर आमच्यासोबत कधी चांगली चर्चा केली नाही किंवा आम्हाला गुन्हा तसेच तपासासंदर्भाने काही माहिती दिली नाही, असा आरोपही त्यांनी लावला. राहुलच्या गळ्यात सोन्याची साखळी, अंगठी असायची त्याबाबत अन् पैशाच्या पाकिटाबाबतही आम्हाला काही माहिती दिली नाही, असे आग्रेकर पिता-पुत्र म्हणाले.
दुर्गेशसंबंधाने बोलताना त्याच्याशी आमचा कधीच वाद झाला नाही. व्यावसायिक संबंध त्याच्यासोबत सर्वांशीच चांगले होते, असेही ते म्हणाले. दुर्गेशसोबत काही दिवसांपूर्वी मुंबईला लॉटरीच्या मीटिंगच्या निमित्ताने गेलो होतो, त्यामुळे त्याला ओळखत होतो, असे जयेश म्हणाला. तो रोजच आम्हाला लॉटरीच्या संबंधाने फोन करायचा. त्यादिवशी मात्र त्याचा एकही फोन आला नाही. त्याच्या भावाचे फोन येत होते. त्यामुळे त्याच्यावर आमचा संशय गेला, असे आग्रेकर म्हणाले. त्याने कोणत्या उद्देशाने हे निर्घृण कृत्य केले त्याची आम्हाला माहिती नाही. मात्र, या गुन्ह्यात त्याच्यासह किमान सहा आरोपी असावेत, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. राहुलला केवळ तीन महिन्यांची मुलगी आहे. त्याला असे अमानुषपणे संपविणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करावी आणि कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही आग्रेकर कुटुंबीयांनी केली.

म्हणून गेला राहुलचा बळी
दुर्गेशला राहुल नेहमी मदत करायचा. एक आठवड्यापूर्वी राहुलकडे आरोपी दुर्गेश आला. साक्षगंध असल्यामुळे एक लाख रुपये उधार दे, असे तो म्हणाला. राहुलने कोणतेही आढेवेढे न घेता त्याला एक लाख रुपये दिले. त्यानंतर दुर्गेश आणि त्याच्या साथीदारांची मती बिघडली. राहुलच्या खात्यात २० कोटींपेक्षा जास्त रक्कम आहे, असे आरोपीला कळले. म्हणून त्याचे अपहरण करून त्याच्याचकडून तगडी रोकड उकळण्याचा कट आरोपींनी रचला होता. तो ओळखत होता. त्यामुळे त्याला जमीन दाखविण्याच्या बहाण्याने नागपूरबाहेर नेले आणि त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी खंडणीसाठी फोन केल्याचा अंदाज पोलिसांनी काढला आहे.

Web Title: The anger of the deceased Rahul Agrekar's family on police investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून