कंगनाच्या 'त्या' वक्तव्यावरून संताप; मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 04:00 PM2021-11-16T16:00:33+5:302021-11-16T16:04:32+5:30
अभिनेत्री कंगना राणौतच्या वादग्रस्त विधानानंतर ठिकठिकाणी रोष व्यक्त केला जात आहे. नागपुरात तर कंगना ही मनोरुग्ण असून तिला मनोरुग्णालयात दाखल करा, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.
नागपूर : अभिनेत्री कंगना रणौतने भारताला १९४७ साली भीक मिळाली व स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिच्या या विधानानंतर सर्वत्र टीकेची झोड उडत आहे. तर, नागपुरात मात्र, कंगना मनोरुग्ण असून तिला मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहणारी कंगना रणौत यंदाही वादात सापडली आहे. तिने भारताला १९४७ साली भीक मिळाली व स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले, असे वादग्रस्त विधान केले होते. तिच्या या विधानावरून देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. तसेच काही ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. तिचा पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपतींनी काढून घ्यावा आणि तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशीही मागणी होत आहे.
नागपुरातही कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. इतकेच नव्हे तर, कंगनाची मानसिक स्थिती बिघडली असून तिला उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल करा अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदनही मनोरुग्णालय अधिक्षकांना देण्यात आले आहे.