वस्तीत पाणी तुंबल्यामुळे संताप, माजी नगरसेवकाला मारहाण; आरोपीच्या कुटुंबीयांचा भलताच आरोप

By योगेश पांडे | Published: June 18, 2024 10:18 PM2024-06-18T22:18:38+5:302024-06-18T22:18:59+5:30

यासंदर्भात आरोपीच्या कुटुंबियांनी ‘लोकमत’ला फोन करून या प्रकरणात कुठलीही मारहाण झाली नसल्याचा दावा केला.

Anger over water logging in the homes, former corporator beaten up; Accused's family alleges wrongly nagpur news crime | वस्तीत पाणी तुंबल्यामुळे संताप, माजी नगरसेवकाला मारहाण; आरोपीच्या कुटुंबीयांचा भलताच आरोप

वस्तीत पाणी तुंबल्यामुळे संताप, माजी नगरसेवकाला मारहाण; आरोपीच्या कुटुंबीयांचा भलताच आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मनपाची पोलखोल झाली व अनेक ठिकाणी पाणी तुंबले. मात्र पाणी तुंबल्याचा केवळ नागरिकच नव्हे तर एका माजी नगरसेवकालादेखील वेगळाच फटका बसला. वस्तीत पाणी तुंबल्यावरून संतप्त झालेल्या नागरिकांपैकी काहींनी माजी नगरसेवक दीपक चौधरी यांना मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर प्रकरण पोलिसांत गेले. नागरिकांकडून चौधरी यांच्याच माणसांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दीपक चौधरी हे अयोध्यानगरात राहतात. त्यांच्या घराच्या मागील भागात सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. सोमवारी आलेल्या पावसामुळे पाणी तुंबले व अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. यामुळे नागरिक संतापले व उद्घाटनाच्या वेळी तुम्ही समोर समोर करता, आता आमची समस्या सोडविण्यासाठी समोर या असे चौधरी यांना सुनावले. चौधरी यांनी कंत्राटदाराला फोन केला व रस्त्यावरील मलबा दूर करण्यास सांगितले. त्यावेळी जवळपास शंभर लोक उपस्थित होते. काही वेळाने चौधरी घराकडे जाण्यास निघाले असता मंगेश उर्फ संजय श्रावण शेरकर (५५,अयोध्यानगर) याने चौधरी यांना शिवीगाळ करत जेसीबी त्याच्या घराजवळ नेण्यास सांगितले. त्यानंतर दोन अनोळखी तरुणांनी येऊन चौधरी यांना मारहाण केली. तर शुभम श्रावण शेरकरने पेव्हर ब्लॉक उचलून चौधरी यांच्या कपाळावर प्रहार केला. त्यानंतर दोघेही शिवीगाळ करत व जीवे मारण्याची धमकी देत पळून गेले. चौधरी यांना नागरिकांनी खाजगी इस्पितळात नेले व त्यांच्यावर चार टाके लागले. यानंतर चौधरी यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीच्या कुटुंबियांचा दावा, चौधरींकडूनच धमकी
दरम्यान, यासंदर्भात आरोपीच्या कुटुंबियांनी ‘लोकमत’ला फोन करून या प्रकरणात कुठलीही मारहाण झाली नसल्याचा दावा केला. चौधरी नेतागिरी करण्यासाठी पोहोचल्यावर आम्ही आमच्या घराची स्थिती पाहण्याबाबत म्हटले. मात्र चौधरीच दगड घेऊन मारण्यासाठी धावले व त्यांनी तो फेकून मारला. शेरकर खाली वाकल्यामुळे बचावले. चौधरीला पकडण्याच्या प्रयत्नात दोघेही खाली पडले व त्यात चौधरीला जखम झाली. चौधरी दारूच्या नशेत होते व रात्री चौधरी यांचे समर्थक आमच्या घरात शिरले व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच घरातील महिलांनादेखील अश्लिल शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. पोलीस ठाण्यात गेलो असता चौधरीने तेथेच तुमच्या घरातच कार्यक्रम करायचा आहे का या शब्दांत धमकी दिल्याचा आरोप शेरकरच्या कुटुंबियांनी केला आहे. राजकीय नेत्यांच्या दबावात आमच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौधरीविरोधात कारवाई का झाली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
 

Web Title: Anger over water logging in the homes, former corporator beaten up; Accused's family alleges wrongly nagpur news crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.