ठाकरे बंधूंविरोधात विदर्भवाद्यांचा संताप
By admin | Published: September 15, 2016 02:34 AM2016-09-15T02:34:54+5:302016-09-15T02:34:54+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मुंबईतील पत्रपरिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाचे बुधवारी नागपुरात पडसाद उमटले.
राज, उद्धव ठाकरे यांचे जाळले ‘पोस्टर्स’: विदर्भाचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार
नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मुंबईतील पत्रपरिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाचे बुधवारी नागपुरात पडसाद उमटले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विदर्भवाद्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘पोस्टर्स’ जाळले. विदर्भाच्या विरोधात ‘स्टंटबाजी’ करून प्रसिद्धी मिळविण्याचा मनसे, शिवसेनेचा प्रयत्न आहे. परंतु आता विदर्भाचा लढा आणखी तीव्र करण्यात येईल, असा निर्धार यावेळी विदर्भवाद्यांनी व्यक्त केला.
मुंबई पत्रकार संघातील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गोंधळ घातला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी कोअर कमिटी सदस्य अँड वामनराव चटप यांना धक्काबुक्की केली होती. याच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते सकाळी ११ वाजता नागपुरातील व्हेरायटी चौकात एकत्र आले. यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. बाळासाहेब ठाकरे, राज व उद्धव ठाकरे यांचे ‘पोस्टर्स’ जाळण्यात आले. तसेच राज ठाकरे यांचा पुतळादेखील जाळण्यात आला. यावेळी माजी खासदार व ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे, अॅड.नंदा पराते व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ही मुंबई नव्हे, विदर्भभूमी आहे
मनसे, शिवसेना यांचे अस्तित्व मुंबईपुरतेच मर्यादित आहे. मुंबई म्हणजे संपूर्ण राज्य होत नाही. स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने जनसमर्थन आहे. जनतेच्या भावनांचा मनसे किंवा इतर कुठलाही पक्ष अपमान करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी विदर्भवाद्यांनी दिला.
कडक सुरक्षा व्यवस्थेत जाळला पुतळा
विदर्भवादी कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे तणाव निर्माण होऊ नये यासाठी व्हेरायटी चौक परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीदेखील विदर्भवाद्यांनी राज ठाकरे यांचा पुतळा जाळून आपला निषेध व्यक्त केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नागपूर शहर अध्यक्ष डॉ.दिलीप नरवडीया, राम नेवले, डॉ.श्रीनिवास खांदेवाले, अॅड.नंदा पराते, अरविंद देशमुख, अनिल तिडके, बाळू घरडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते. ज्येष्ठ विदर्भवादी नेते व माजी खासदार जांबुवंतराव धोटे हेदेखील निषेध करण्यासाठी उपस्थित झाले होते. यासोबतच विदर्भ कनेक्ट, विदर्भ राज्य आघाडी इत्यादी विदर्भवादी संघटनांचे कार्यकर्तेदेखील आले होते.