पाच हजार भरा तरच अॅन्जिओेग्राफी
By admin | Published: June 12, 2017 02:15 AM2017-06-12T02:15:58+5:302017-06-12T02:15:58+5:30
तुम्ही दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) असाल तरीही ‘अॅन्जिओग्राफी’साठी पाच हजार रुपये भरणे आवश्यक आहे.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : जीवनदायीच्या लाभार्थ्यांकडूनच पैशांची मागणी
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुम्ही दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) असाल तरीही ‘अॅन्जिओग्राफी’साठी पाच हजार रुपये भरणे आवश्यक आहे. त्या शिवाय ही तपासणीच होत नाही. शासकीय रुग्णालयांमध्ये ‘बीपीएल’च्या रुग्णांवर नि:शुल्क उपचार करण्याचे शासनाचे आदेश असताना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह खासगी इस्पितळांमध्ये गरीब रुग्णांकडून हा पैसे उकळण्याचा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. परिणामी, पैशांअभावी रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
हृदयाचा आजार आता श्रीमंतांचा राहिलेला नाही. तो सामान्य कामगार, गरिबांच्या घरातही दिसू लागला आहे. या आजाराच्या रुग्णाला इस्पितळात दाखल करण्याची वेळ आली तर मोठे संकट कोसळल्याप्रमाणे त्या घराची स्थिती होते आणि प्रत्यक्ष आजारापेक्षादेखील त्यावरचा उपचाराच जास्त मोठे संकट असल्यासारखे वाटते. खासगी इस्पितळातील लूट आणि शासकीय इस्पितळात नेल्यास पैशासोबतच रु ग्ण जीवानिशी जाण्याची भीती या कात्रीत सापडला आहे. विशेष म्हणजे, गोरगरीब रु ग्णांना दर्जेदार उपचार देण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत (पूर्वीची ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’) या चाचणीचा समावेश आहे. तरीही या योजनेतील सर्व खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये लाभार्थ्यांना पैसे मोजावे लागत आहे.
शुल्क भरण्याची जाचक अट
सुत्रानूसार, पूर्वी जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांकडून अॅन्जिओग्राफीसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुल्क आकारले जात नव्हते, परंतु काही खासगी इस्पितळे याचा फायदा घेऊ लागल्याने ‘सुपर’ने पाच हजार रुपये शुल्क आकारणे सुरू केले. याला पाहून योजनेतील खासगी इस्पितळांनीही हे शुल्क आकारणे सुरू केले. याचा फटका मात्र गरीब रुग्णांना बसत आहे. लाभार्थी असूनही ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी ही चाचणी करावीच नाही का, असा प्रश्न विचारल्या जात आहे.
खासगीमध्ये पैसेही परत मिळत नाही
या योजनेच्या लाभार्थ्याने शुल्क भरुन अॅन्जिओग्राफी केल्यानंतर त्यात दोष आढळून आल्यास आणि नंतर अॅन्जिओप्लास्टी केल्यास त्या रुग्णाला हे पाच हजार रुपये परत मिळतात. मात्र, अॅन्जिओग्राफीमध्ये दोष आढळून न आल्यास पैसे मिळत नाही. हे पैसे संबंधित रुग्णालयाच्या खात्यात जमा होतात. असा अजब कारभार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह योजनतील सर्वच खासगी इस्पितळांमध्ये बिनबोभाट सुरू आहे.
लाभार्थ्यांकडून पैसे घेणे गंभीर बाब
जीवनदायी आरोग्य योजनेत समावेश असलेल्या उपचारासाठी लाभार्थ्यांकडून पैसे उकळले जात असेल तर, ही गंभीर बाब आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘बीपीएल’रुग्णाकडून अॅन्जिओग्राफीचे शुल्क आकारण्याची तक्रार प्राप्त झाल्यास त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल. हा प्रकार थांबायला हवा.
-गिरीश महाजन,
वैद्यकीय शिक्षण मंत्री