बहिणीसोबत फिरणाऱ्या तरुणाला संतप्त भावाने भोसकले; आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 01:16 PM2021-02-06T13:16:54+5:302021-02-06T13:32:37+5:30
Nagpur News नात्यातील तरुणीसोबत फिरताना दिसल्याने संतप्त झालेल्या एका आरोपीने चाकूहल्ला करून एका तरुणाला गंभीर जखमी केले. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - नात्यातील तरुणीसोबत फिरताना दिसल्याने संतप्त झालेल्या एका आरोपीने चाकूहल्ला करून एका तरुणाला गंभीर जखमी केले. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.
अक्षय दिलीप वानखेडे (वय २७) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो बोरगावचा रहिवासी असून, ईलेक्ट्रीशियनचे काम करतो. तर, सागर ईश्वर लांडगे (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. तो आयबीएम रोडवर राहतो.
आरोपी लांडगेच्या नात्यातील एका तरुणीचे वानखेडेसोबत आठ महिन्यांपासून प्रेमसंबंध आहे. काही दिवसांपूर्वी लांडगेला ते दोघे एकत्र फिरताना दिसले, तेव्हा वानखेडे आणि आरोपी लांडगेत वाद झाला होता. यानंतर ‘हिच्या’सोबत दिसल्यास परिणाम चांगले होणार नाही, असे आरोपीने बजावले होते. या पार्श्वभूमीवर, बुधवारी वानखेडे त्याच्या प्रेयसीसोबत फिरायला गेला होता. रात्री ९ च्या सुमारास ते दोघे केटीनगरकडून येताना दिसताच आरोपीने त्यांना माहुरे पेट्रोल पंपाजवळ रोखले. वानखेडेसोबत वाद घालून आरोपीने चाकूने भोसकून त्याला गंभीर जखमी केले. प्रेयसीने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूची मंडळी जमली. जखमी वानखेडेला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान, वानखेडेचे बयाण नोंदवून घेतल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी लांडगेला अटक केली.