संतप्त नागरिकांनी केला रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:16 AM2017-08-05T02:16:22+5:302017-08-05T02:17:00+5:30
भांडण सोडविण्यास गेलेल्या व्यक्तीला जबर मारहाण केली. त्यात जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : भांडण सोडविण्यास गेलेल्या व्यक्तीला जबर मारहाण केली. त्यात जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने मृतदेह रस्त्यात ठेवून रास्तारोको केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रमेश बाबुलाल मेश्राम (४६, रा. राजीवनगर) असे मृताचे नाव आहे. २९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास राजीवनगर परिसरात अण्णा चायनीज ठेल्यावर सोनू अजय शहा, रितेश सिंह यांच्यासह अन्य दोन विधिसंघर्ष ग्रस्त बालकांनी नाश्ता केला. नाश्त्याचे पैसे मागताच त्यांनी ठेला मालक अण्णा जेना आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण करायला लागले.
दरम्यान भांडण सोडविण्यासाठी रमेश मेश्राम यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे आरोपींनी रमेश यांना बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना लगेच नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तेथे उपचारादम्यान ३ आॅगस्टला मृत्यू झाला. या प्रकरणी एमआायडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तीन आरोपींना गुरुवारीच अटक केली.
दरम्यान, शुक्रवारी उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. मृतदेह राजीवनगर येथे आणल्यानंतर संतप्त नागरिकांनी हिंगणा मार्गावर मृतदेह ठेवून रास्तारोको आंदोलन केले.
या घटनेतील फरार आरोपीला तात्काळ अटक करा, परिसरात सुरू असलेले अवैध धंदे, अवैध दारुविक्री बंद करा, अशी मागणी त्यांनी केली. तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन चालले.
याबाबत पोलिसांना माहिती होताच त्यांनी घटनास्थळ गाठून आंदोलकांना शांत केले. आरोपीला लवकरच अटक करू, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. नंतर रमेशच्या पार्थिवावर वानाडोंगरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या खून प्रकरणात पोलिसांनी सोनू शहा याच्यासह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.