Maharashtra Assembly Election 2019 : नाराज कोहळे गडकरींच्या दारी  : समर्थक उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 10:06 PM2019-10-02T22:06:16+5:302019-10-02T22:07:44+5:30

दक्षिण नागपुरातून उमेदवारी न दिल्यामुळे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. अन्याय झाल्याच्या नाराजीतून कोहळे यांनी बुधवारी दुपारी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थानच गाठले.

Angry Kohale at Gadkari's doorstep: Supporters on the streets | Maharashtra Assembly Election 2019 : नाराज कोहळे गडकरींच्या दारी  : समर्थक उतरले रस्त्यावर

Maharashtra Assembly Election 2019 : नाराज कोहळे गडकरींच्या दारी  : समर्थक उतरले रस्त्यावर

Next
ठळक मुद्देउमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षाविरोधातच निदर्शने

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : दक्षिण नागपुरातून उमेदवारी न दिल्यामुळे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. अन्याय झाल्याच्या नाराजीतून कोहळे यांनी बुधवारी दुपारी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थानच गाठले. यावेळी त्यांनी गडकरी यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. दुसरीकडे कोहळे यांच्या समर्थकांनी दक्षिण नागपुरात भाजपविरोधातच निदर्शने केली व रस्त्यांवर नाराजीचा सूर उमटला.


मंगळवारी जाहीर झालेल्या भाजपच्या यादीत दक्षिण नागपूरचे तिकीट मोहन मते यांना देण्यात आले. त्यानंतर कोहळे यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी एकत्रित येत नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊन असे प्रतिपादन कोहळे यांनी मंगळवारी केले होते. बुधवारी सकाळी परत कोहळे यांचे कार्यकर्ते एकत्रित आले. नाराज कार्यकर्त्यांनी उदयनगर चौकात बराच वेळ निदर्शने केली व रास्ता रोको करण्याचादेखील प्रयत्न केला. त्यानंतर कोहळे हे आपल्या समर्थकांसह नितीन गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांनी आपल्या भावना गडकरी यांच्यासमोर मांडल्या. माझ्यावर अन्याय झाला असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी यांनी कोहळे यांची समजूत काढली व निराश न होण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, मध्य नागपुरातून प्रवीण दटके यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे नाराज समर्थकदेखील गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले. गडकरी यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली व त्यांची समजूत काढून त्यांना शांत केले.
हा कार्यकर्त्यांचा अपमान : कोहळे
हा माझ्या एकट्यावर झालेला अन्याय नाही. तर कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय व अपमान आहे. दक्षिण नागपुरच्या विकासासाठी कार्यकर्ते पाच वर्षे अक्षरश: झटले. चांगले काम करूनही आता मला तिकीट न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत, अशी प्रतिक्रिया सुधाकर कोहळे यांनी दिली. दक्षिण नागपुरातून अपक्ष उभे राहणार का असा प्रश्न केला असता कार्यकर्ता जे म्हणतील त्यानुसार पुढील पावले उचलण्यात येतील असे त्यांनी उत्तर दिले.
कोहळे समर्थकांची नाराजी स्वाभाविक : मते
सुधाकर कोहळे यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. त्यातून प्रतिक्रिया उमटतातच व ही बाब स्वाभाविकदेखील आहेत. परंतु कोहळे व त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी मी दूर करेल. यासाठी कोहळे यांची भेटदेखील घेईल. सर्व कार्यकर्ते निवडणूकीत प्रामाणिकपणे पक्षाचे काम करतील, असा विश्वास मोहन मते यांनी व्यक्त केला.

Web Title: Angry Kohale at Gadkari's doorstep: Supporters on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.