दृष्टिहीन अनिकेतच्या स्वरलहरीने दुबई जिंकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 09:59 AM2018-11-22T09:59:29+5:302018-11-22T10:02:51+5:30
अंधार असला तरी सप्तसुरांवर मिळविलेल्या कौशल्याचा ठसा त्याने देशाबाहेर उमटवला. दुबई येथे झालेल्या सांस्कृतिक समारोहात त्याने सुवर्णझेप घेतली. ही यशोगाथा आहे नागपूरच्या अनिकेत बेंडे या विद्यार्थ्यांची.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समुद्रातील पाणी डोळ्यात गेल्याचे निमित्त झाले आणि स्टीव्हन जॉन सिन्ड्रोम नावाच्या दुर्मिळ आजाराने वयाच्या पाचव्या वर्षी त्याला काळोखात लोटले. नियतीने त्याच्यावर आघात केला पण काळोखाआड पाहिलेल्या स्वप्नांचा पाठलाग करणे त्याने सोडले नाही. अंधार असला तरी प्रकाश वेचण्याची जिद्द आणि त्यातून सप्तसुरांवर मिळविलेल्या कौशल्याचा ठसा त्याने देशाबाहेर उमटवला. नुकत्याच दुबई येथे झालेल्या बहुभाषीय संगीत, सांस्कृतिक समारोहात शंभरावर देशातील ८०० विद्यार्थ्यांमधून त्याने सुवर्णझेप घेतली. ही यशोगाथा आहे नागपूरच्या अनिकेत बेंडे या विद्यार्थ्यांची.
विशेष म्हणजे मागील वर्षी श्रीलंकेत झालेल्या याच आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात त्याने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. हे अनिकेतने मिळवलेले पहिलेच यश नाही. याच अनिकेतने दहावीच्या परीक्षेत दृष्टिहीन गटातून राज्यात पहिला क्रमांक आणि पुढे बारावीच्या परीक्षेतही इंग्रजी माध्यमातून कला शाखेत ८८ टक्के गुण घेऊन त्याने राज्यात बाजी मारली होती. तो सध्या पुण्यात बी.ए. च्या अंतिम वर्षाला आहे. अनिकेतला लहानपणापासून संगीताची आवड आहे. किंबहुना याच सप्तसुरांच्या सोबतीने त्याच्या अंधारलेल्या आयुष्याला प्रकाशाची दिशा मिळाली आहे. सुरांच्या साथीने त्याला शिक्षणात यश मिळत गेले. ऐकता ऐकता हे संगीत तो स्वत: कुठेही न शिकता आत्मसातही करू लागला. त्याच्या गळ्यातून आणि हाताबोटातून हे स्वर घुमू लागले.
आज एखाद्या प्रशिक्षित विद्यार्थ्यासारखा तो हे संगीत स्वत: कंपोज करतो, लिहितो आणि गातोही. अखिल भारतीय कला व सांस्कृतिक संघ, पुणेतर्फे त्याला श्रीलंका व दुबई येथे आंतरराष्ट्रीय महोत्सवात सादरीकरण करण्याची संधी मिळाली व त्याने संधीचे सोने केले. अनिकेतने वाद्य गटात सुवर्ण तर गायनात रजत पदक प्राप्त केले.
आयएएस अधिकारी होण्याची इच्छा
अनिकेत दृष्टिहीन असला तरी त्याची इच्छाशक्ती व आत्मविश्वास मोठा आहे. संगीतात प्राविण्य मिळवित असला तरी त्याची आयएएस अधिकारी होण्याची इच्छा आहे व यासाठी त्याने आतापासून तयारीही सुरू केली आहे. डोळसांनाही हेवा वाटावा अशीच त्याची जिद्द आहे.