भर पावसात अनिल देशमुखांनी गाजवली सभा, भाषणाचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 06:17 PM2023-07-01T18:17:25+5:302023-07-01T18:20:19+5:30
अनिल देशमुख यांनी भर पावसात सभेला संबोधित केले
नागपूर : काटोल तालुक्यातील कचारी सावंगा येथे विविध कामांचे भूमीपूजन कार्यक्रम सोहळा नुकताच पार पडला. माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस नेतेअनिल देशमुख यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. यानिमित्त गावातील बाजार चौकात रात्रीच्या वेळी सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान अनिल देशमुख यांच्या भाषणाच्यावेळी पावसाच्या सरी सुरू झाल्या. त्यामुळे कार्यक्रम गुंडाळला जाईल असे वाटत होते. मात्र अनिल देशमुखांनी भर पावसात भाषण सुरूच ठेवले. तब्बल ३० मिनीटे त्यांनी भाषण केले.
कचारी सावंगा येथे ३० जूनरोजी पाणंद रस्ता भूमीपूजन, जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी भूमीपूजन आणि सिमेंट रस्ता भूमीपूजन कार्यक्रम पार पडला. तसेच यावेळी कचारीसावंगा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ७ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती देशमुख यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला निलेश दुबे यांनी प्रास्ताविक केले. तर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, पंचायत समिती सभापती संजय डांगोरे यांनी भाषणे केली. त्यानंतर देशमुख यांच्या भाषणावेळी पावसाला सुरूवात झाली. नागरिकांनी आपल्या खुर्च्या सोडून मंदिराचा आसरा घेतला. परंतू देशमुख यांनी जागा सोडली नाही व पावसात ३० मिनीटे उभे राहून भाषण ठोकले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात केलेलं भाषण चांगलच गाजलं होतं. त्यांचा उत्साह पाहून कार्यकर्तेही भारावून गेले होते. या भाषणातून त्यांनी आपण इतर नेत्यांपेक्षा वेगळे का आहोत, हे दाखवून दिले. अशाचप्रकारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भारत जोडो यात्रेच्या वेळी जम्मू काश्मीर येथे वादळी बर्फवृष्टी सुरू असताना भाषण केलं होतं. त्यांचही हे भाषण चांगलंच गाजलं. राहुल गांधींचं बर्फवृष्टी दरम्यान झालेलं भाषण पाहून अनेक नेटकऱ्यांनी शरद पवार यांनी भर पावसात केलेल्या भाषणाची आठवण केली. तर आता अनिल देशमुखांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत असून परिसरात या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.
भर पावसात अनिल देशमुखांचे भाषण.#anildeshmukh#nagpurpic.twitter.com/ZxPAwdo0TL
— Lokmat (@lokmat) July 1, 2023