अनिल देशमुख यांना चांदीवाल आयोगाची क्लीन चिट नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 05:52 PM2024-11-14T17:52:18+5:302024-11-14T17:53:38+5:30
Nagpur : नरखेड येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शंभर कोटी वसुली प्रकरणात चांदीवाल आयोगाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली नाही. हे निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांच्या मुलाखतीवरून स्पष्ट झाले आहे. देशमुख क्लीन चिट मिळाल्याचे खोटे सांगत असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
काटोल मतदारसंघातील महायुतीचे (भाजप) उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारार्थ नरखेड येथे आयोजित सभेत फडणवीस यांनी देशमुख आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले, चांदीवाल आयोग महाविकास आघाडी सरकारने स्थापन केला होता. आयोगाने अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला; परंतु त्यांनी तो अहवाल उघड केला नाही. इतकेच नाही तर महाविकास आघाडीचे उमेदवार सलील देशमुख यांनी बदलीसाठी ४० लाख रुपये घेतल्याचे पुरावे वाझे देत होता; परंतु कार्यक्षेत्रात येत नसल्याने तो पुरावा घेता आला नाही, असेही मुलाखतीत चांदीवाल यांनी सांगितले.
गेल्या वीस वर्षांत काटोल नरखेडचा विकास झाला नाही. भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्याकडे विकास कसा करावा, निधी कसा मिळवावा याचे कसब आहे त्याकरिता मी स्वतः, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे ठाकूर यांच्या पाठीशी भक्कमपणे आहोत. या क्षेत्रात उद्योग, संत्रा प्रक्रिया केंद्राकरिता सबसिडी व आवश्यक ती मदत करू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. कन्हान डायव्हर्शनला मंजुरी दिली असून, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर तालुक्याला त्याचा फायदा होईल. समृद्धी महामार्गामुळे उद्योग विदर्भात यायला लागले. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होत असल्याचे म्हणाले.
सभेला काटोल मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी अविनाश ठाकरे, चरणसिंग ठाकूर, उकेश चौहान, दिनेश ठाकरे, नरेश अरसडे, समीर उमप, अजय बालपांडे, सतीश रेवतकर, रवी वैद्य, सुरेश खसारे यांच्यासह भाजप व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.