प्रकरणात विश्वासार्हता नसल्याने अनिल देशमुखांना मिळाला जामीन
By दयानंद पाईकराव | Published: July 29, 2024 03:13 PM2024-07-29T15:13:13+5:302024-07-29T15:14:38+5:30
सलील देशमुख यांची माहिती : वैद्यकीय कारणावरून जामिनाचा आरोप बिनबुडाचा
नागपूर : अनिल देशमुख यांना वैद्यकीय कारणावरून जामीन मिळाला, असा विरोधकांचा आरोप बिनबुडाचा असून त्यांच्यावर आरोप केल्याच्या प्रकरणात विश्वासार्हता नसल्यामुळे त्यांना जामीन मिळाला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) युवा नेता तथा जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सलील देशमुख म्हणाले, अनिल देशमुख यांना वैद्यकीय कारणावरून जामीन देण्यात आला, असा आरोप मंत्रीपदाचे डोहाळे लागलेले आमदार आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी करीत आहे. परंतु असा आरोप करण्यापूर्वी त्यांनी न्यायालयाने जामीन देताना जे निरीक्षण नोंदविले त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार अनिल देशमुख यांच्या विरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत. ऐकीव माहितीवर त्यांच्यावर आरोप करण्यात आले असून भविष्यात अनिल देशमुख या प्रकरणात दोषी ठरू शकणार नाही. याशिवाय न्यायमुर्ती चांदीवाल यांनी २ वर्षांपूर्वी अनिल देशमुख यांना क्लिन चिट दिली आहे. खोटे आरोप करण्यास नकार दिल्यामुळे अनिल देशमुख यांना तुरुंगात टाकण्यात आले. देशमुख कुटुंबाला नाहक त्रास देऊन १३० धाडी टाकण्यात आल्या. एवढेच काय तर आपल्या सहा वर्षाच्या मुलीची चौकशी करण्यात आली. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचार व धमक्यांना आम्ही घाबरणार नसल्याचे सलील देशमुख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) जिल्हाध्यक्ष प्रविण कुंटे, शैलेंद्र तिवारी, दुनेश्वर पेठे, नुतन रेवतकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.