अनिल देशमुखांनी स्वत:च्या काटोल मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे
By कमलेश वानखेडे | Published: September 6, 2024 05:49 PM2024-09-06T17:49:54+5:302024-09-06T17:50:28+5:30
भाजप नेत्यांकडून पुन्हा आव्हान : एकतरी उद्योग आणला का ?
कमलेश वानखेडे, नागपूर
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भाजप जोरात सक्रीय झाली असून त्यांची चौफेर कोंडी करण्याची तयारी चालविली आहे. देशमुख यांना दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढायचे आहे. त्यामुळे ते त्यांच्यावर सातत्याने आरोप करीत आहेत. देशमुख यांनी स्वत:च्या काटोल मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान भाजप नेत्यांनी दिले आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे म्हणाले, अनिल देशमुख भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी काटोल मतदारसंघात कुठले उद्योग आणले नाही. काटोलच्या विकासासाठी यावेळी भाजपचा उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. भाजप पूर्ण ताकदीनीशी या मतदारसंघात लढेल. स्वत:ची उंची वाढविण्यासाठी देशमुख हे डणवीस यांच्या विरोधात लढण्याचे मनसुबे व्यक्त करीत आहेत. मात्र यावेळी देशमुख यांना त्यांच्याच मतदारसंघात चीत केले जाईल, असा दावाही कोहळे यांनी केला. माजी आ. आशीष देशमुख म्हणाले, काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्या विरोधात वातावरण आहे. ते तेथून पराभूत होणार असल्याने नवीन मतदारसंघ शोधत आहेत. काटोलात यावेळी देशमुख यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला.