अनिल देशमुख प्रकरण : गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना ईडीचे समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 11:48 AM2021-09-30T11:48:58+5:302021-09-30T12:08:24+5:30
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आपीएस बदली रॅकेट प्रकरणी गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना ईडीनं समन्स बजावला आहे. पोस्टिंग आणि बदल्यांसंदर्भात गायकवाड यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आपीएस बदली रॅकेटप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) आता राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना समन्स बजावले आहे. त्याबाबत गायकवाड हे ईडी कार्यालयात दाखल झाल्याची माहिती आहे.
अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग करताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप समोर आला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लागला. मननी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर छापे सुद्धा टाकले होते. तर, काही दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुखांच्या घरासह इतर मालमत्तांवर धाड टाकली होती. असं असूनही देशमुख अद्याप ईडीसमोर आलेले नाहीत, त्याऐवजी त्यांनी न्यायालयात जाण्याचा मार्ग निवडला.
देशमुख हे ईडीसमोर आले नसले तरी त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी ईडीनं सुरू केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचीही चौकशी ईडीनं केली होती. तर, आज गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.