राजकारणातून देशमुखांना गोवण्यात आले; दिलीप वळसे-पाटील यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2022 03:12 PM2022-12-13T15:12:57+5:302022-12-13T15:13:31+5:30
केंद्र सरकारने या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ज्या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता त्या प्रकरणात त्यांना केवळ राजकारणाचा भाग म्हणून गोवण्यात आले. सोमवारी त्यांना जामीन मिळाला, पण लगेच १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा निकाल लागेल तेव्हा देशमुख हे नक्कीच निर्दोष सुटतील, असा दावा करीत माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी देशमुख यांची भक्कमपणे पाठराखण केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हर्च्युअल रॅलीसाठी वळसे-पाटील सोमवारी गणेश पेठेतील पक्ष कार्यालयात आले होते. या रॅलीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, देशमुख यांना अटक होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. त्यांची सुटका होईल याची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. देशमुख यांनी वेळोवेळी त्यांची बाजू न्यायालयात मांडली. मात्र, जामीन मिळाला नाही. राजकीय सूड घेण्याचा प्रकार या प्रकरणात झालेला आहे. पण, ते निश्चितपणे यातून निर्दोषमुक्त होऊन बाहेर पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्याचे वृत्त समजताच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देशमुख यांच्या सिव्हिल लाइन्स येथील बंगल्यासमोर जमले. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या निनादात जल्लोष केला. एकमेकांना लाडू भरविले. प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, शैलेंद्र तिवारी, शैलेश पांडे, नूतन रेवतकर, योगेश कोठेकर, आदींनी देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. कट रचून देशमुख यांना तुरुंगात डांबण्यात आले. सोमवारी शरद पवार यांच्या जन्मदिवशी जामीन मिळाला. लवकरच देशमुख निर्दोष असल्याचे सिद्ध होईल, असा दावाही यावेळी कार्यकर्त्यांनी केला. यावेळी शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे उपस्थित होते.
राज्यपालांवर केंद्राने कारवाई करावी
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना वळसे-पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर प्रत्येक माणसाच्या मनात आहे. त्यांच्याबद्दल कुणाकडूनही अशा प्रकारचे वक्तव्य होऊ नये. राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या भावना तीव्र आहेत. लोकांमध्ये रोष आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.