अनिल देशमुखांचा राजीनामा घेणे ही चूक होती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 07:59 PM2022-03-22T19:59:31+5:302022-03-22T20:18:41+5:30
Nagpur News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही एक चूक होती. त्यावेळी घाईने निर्णय घेण्यात आला. थोडे संयमाने घ्यायला हवे होते, असे सांगत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मलिक यांच्यासह देशमुखांची उघडपणे पाठराखण केली.
नागपूर : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून फसविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही एक चूक होती. त्यावेळी घाईने निर्णय घेण्यात आला. थोडे संयमाने घ्यायला हवे होते, असे सांगत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मलिक यांच्यासह देशमुखांची उघडपणे पाठराखण केली.
शिवसंपर्क अभियानांतर्गत संजय राऊत हे तीन दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, देशमुख यांच्यावर हेतूपुरस्सर सीबीआयचे २२, ईडीचे ५० व आयटीचे ४० हून अधिक छापे टाकून विक्रम केला गेला. त्याच्याबाबत आलेल्या तक्रारींची पूर्णपणे शहानिशा करण्यात आली नाही. देशमुखांबाबत निर्णय घेण्यात महाविकास आघाडीकडून घाई झाल्याची कबुली त्यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात चंद्रपुरातील जलयुक्त शिवारसह विविध कामांत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे आले आहेत. या सर्व प्रकरणांचा राज्याचे पोलीस तपास करीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: लक्ष ठेवून आहेत. लवकरच कारवाया झालेल्या दिसतील, असा इशाराही राऊत यांनी दिला. पत्रकार परिषदेला खा. कृपाल तुमाने, खा. राहुल शेवाळे, आ. दुष्यंत चतुर्वेदी, किशोर कन्हेरे, प्रमोद मानमोड़े, किशोर कुमेरिया, नितीन तिवारी, दीपक कापसे, विशाल बरबटे, आदी उपस्थित होते.
आता भाजपशी घरोबा नाही
- गेली २५ वर्षे भाजपशी घरोबा केला. विचारधारा एक होती. मात्र, काही कारणास्तव वेगळा मार्ग निवडताच भाजप शिवसेनेशी सूडाने वागली, हे विसरता येणार नाही. आता शिवसेना टोकाला गेली आहे, ती खाली येणे शक्य नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
जनाब भागवत म्हणायचे का?
देशात २४ कोटी मुस्लिम आहेत. त्यातील अनेक लोक भाजप व शिवसेनेला मतदान करतात. भाजप राष्ट्रीय मुस्लिम मंच चालवते. भाजपचे केरळचे राज्यपाल मुस्लिम आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांची गेल्या काळातील बरीच वक्तव्ये मुस्लिम पोषक आहेत. मग त्यांना जनाब भागवत म्हणणार का, असा सवाल राऊत यांनी केला. जिनाने एकवेळ फाळणी केली; पण देशात धार्मिक विद्वेष निर्माण करून दररोज फाळणी करणे सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
एमआयएमसोबत कधीच युती नाही
- भाजप व एमआयएमने उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये छुपी युती केली होती. निकालांवरून ते स्पष्ट झाले आहे. आता शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपच्या इशाऱ्यावरच एमआयएमने युतीची ऑफर दिली आहे. मात्र, शिवसेना कधीच एमआयएमसोबत युती करणार नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
चित्रपटाने पीओके मिळणार नाही
- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने काश्मिरी पंडितांना आसरा दिला. गेल्या सात वर्षांत फक्त १६ टक्के काश्मिरी पंडितांना घरे देण्यात आली. एखादा चित्रपट काढून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताला मिळणार नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.