आयकर विभागाच्या धाडीने अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:08 AM2021-09-18T04:08:44+5:302021-09-18T04:08:44+5:30
नागपूर : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सहावेळा धाडीची कारवाई केल्यानंतर आयकर विभागाने शुक्रवारी पहिल्यांदा ...
नागपूर : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सहावेळा धाडीची कारवाई केल्यानंतर आयकर विभागाने शुक्रवारी पहिल्यांदा नागपूर, काटोल आणि मुंबई येथील घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या. या धाडीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोख आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे. ही कारवाई आयकर विभागाच्या मुंबई आणि नागपूर येथील अधिकाऱ्यांनी केली. या संदर्भात विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी कारवाई सुरू असल्याचे सांगितले.
शुक्रवारी सकाळी अनिल देशमुखांच्या रामदासपेठ येथील मिडास हाईट्समधील कार्यालय आणि फेटरीजवळील एनआयटी कॉलेज व नागपूर आणि काटोल येथील घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाचवेळी धाडी टाकल्या. रोख आणि काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या धाडीत मुंबई आणि नागपूर विभागाचे २० पेक्षा जास्त अधिकारी सहभागी असल्याचे सूत्रांनी सांगितले. धाडसत्रामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
ईडी आणि आयकर विभागाच्या धाडसत्रामुळे अनिल देशमुखांना दिलासा मिळण्याची कुठलीही चिन्हे सध्यातरी दिसून येत नाही. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तपास यंत्रणा त्यांच्या भोवताल आणखी घट्ट फास आवळत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या विरोधात आता ईडीने लुकआऊट नोटीस जारी केल्याची चर्चा आहे. अनिल देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी पाच वेळा समन्स बजावले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार
आयकर विभागाच्या अन्वेषण विभागाचे संचालक एस.एस. परिडा यांनी धाडीसंदर्भात विस्तृत माहिती देण्यास नकार दिला. केवळ चौकशी व तपासणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रोख आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यावर त्यांनी बोलण्यास टाळले. पुढे कळेलच, असे त्यांनी स्पष्ट केले.