नवख्यांच्या आरत्या अन कार्यकर्ते ‘घरच्या गाईचे गोऱहे’; अनिल गोटे यांची भाजपावर नाराजी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:10 AM2017-12-21T11:10:03+5:302017-12-21T11:10:39+5:30
भाजपाचे धुळे येथील आमदार अनिल गोटे यांनी पक्षाच्या कार्यशैलीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्यांच्या आरत्या ओवाळायच्या व पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना मात्र, ‘घरच्या गाईचे गोऱहे’ आहेत, जातील कुठे, अशी वागणूक दिली जात आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : भाजपाचे धुळे येथील आमदार अनिल गोटे यांनी पक्षाच्या कार्यशैलीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्यांच्या आरत्या ओवाळायच्या व पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना मात्र, ‘घरच्या गाईचे गोऱहे’ आहेत, जातील कुठे, अशी वागणूक दिली जात आहे. गुजरातचा निकाल हा अशा वर्तणुकीचाच फटका आहे, असे रोखठोक मत गोटे यांनी व्यक्त केले आहे.
नाना पटोले यांनी भाजपात होत असलेल्या कुचंबणेवरून खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यानंतर भाजपाचे काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून वेगळ्या विदर्भाच्या आश्वासनाची आठवण करून देत नाराजी व्यक्त केली. या दोन नेत्यांच्या पाठोपाठ आता अनिल गोटे यांनीही पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. गोटे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन करणारे एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, गुजरात विकासाच्या मॉडेलवर भाजपाने संपूर्ण बहुमताने केंद्रात सत्ता आणली. तरीसुद्धा सामान्य माणसाला गृहित धरता येत नाही, हेच गुजरातच्या निकालाने दाखवून दिले आहे. आपल्याला मिळालेली सत्ता तहहयात आहे, अशा गैरसमजात लाटेवर स्वार झालेल्यांच्या डोळ्यात या निकालाने अंजन घातले आहे, असे बेधडक मतही गोटे यांनी माडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विनंतीवरून विविध विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली आहे.