अनिल हिरेखण यांच्याकडे कुलसचिवपदाची सूत्रे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:07 AM2021-01-10T04:07:53+5:302021-01-10T04:07:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. अनिल हिरेखण यांची निवड करण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. अनिल हिरेखण यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने ही थेट नियुक्ती केली आहे. यामुळे कुलसचिवपदाची स्वप्ने पाहणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे. राज्य शासनाकडून थेट नियुक्ती झाल्याने आश्चर्यदेखील व्यक्त करण्यात येत आहे.
ऑगस्ट २०१८ पासून विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव मिळालेले नाहीत. २०१९ मध्ये झालेल्या कुलसचिव निवड प्रक्रियेत डॉ. नीरज खटी यांची निवड झाली होती. मात्र त्यांनी तांत्रिक कारण देत पद स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यानंतर त्यांच्याकडेच प्रभार सोपविण्यात आला होता. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी लवकरच नव्याने प्रक्रिया राबवतील अशी चर्चा होती. मात्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परस्पर कुलसचिव पदावर आस्थापना विभागातील उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांची कुलसचिवपदी निवड केली. यामुळे विद्यापीठातील अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेले आहे. डॉ. हिरेखण यांनी याअगोदरदेखील कुलसचिवपदाची प्रभारी जबाबदारी सांभाळली आहे.