अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार महालक्ष्मे, नानिवडेकर यांना प्रदान
By admin | Published: September 12, 2016 03:06 AM2016-09-12T03:06:15+5:302016-09-12T03:06:15+5:30
विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणार स्व. अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार
उल्लेखनीय कार्याचा सन्मान : विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचा उपक्रम
नागपूर : विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणार स्व. अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर-दर्शने आणि अविनाश महालक्ष्मे यांना रविवारी प्रदान करण्यात आला. २१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदीगड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे सचिव डॉ. गिरीश गांधी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन्ही सत्कारमूर्तींना त्यांच्या भविष्यातील प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी आपल्या भाषणात आजच्या पत्रकारितेवर विशेष भाष्य केले. आज तांत्रिक प्रगतीमुळे पत्रकारितेत सुबत्ता आली पण पत्रकारांची विश्वसनीयता कमी झाली आहे. त्यात पुन्हा पेड न्यूज या प्रकाराने नवीन भर घातली आहे. दुसरीकडे आजच्या पत्रकारितेसमोर सोशल मीडियाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अशा स्थितीत पत्रकारांनी त्यांच्या वाट्याला येणारी स्पेस विधायक पत्रकारितेसाठी वापरावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण चौधरी म्हणाले, मी तिकडे हरियाणात आहे. तिथे मराठी वृत्तपत्र वाचायला मिळत नाहीत. अशावेळी इंटरनेटवर ते वाचावे लागते. पण, सकाळी चहासोबत मुद्रित वृत्तपत्र वाचण्यात जो आनंद आहे तो ई-पेपर वाचण्यात नाही. यावेळी मृणालिनी नानिवडेकर-दर्शने आणि अविनाश महालक्ष्मे या दोन्ही सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी केले. संचालन सरिता कौशिक तर आभार प्रदीप मैत्र यांनी मानले. या कार्यक्रमाला पत्रकार जगतातील मंडळींसोबतच शहरातील अनेक गणमान्य नागरिकही उपस्थित होते. (प्रतिनिधी)