... प्राण्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 10:14 PM2020-08-09T22:14:41+5:302020-08-09T22:15:31+5:30
प्राण्यांपासून माणसांना किंवा माणसांपासून प्राण्यांना कोरोना होत नाही, असे पशुवैद्यकीय अभ्यास सांगतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ आजाराने सध्या देशात सर्वत्र थैमान घातले असून त्याचा फैलाव वेगाने होत आहे. नागपूर जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. यावरून याचा विषाणू अधिक मजबूत होत असून भीषण रूप धारण करीत आहे. यामुळे प्राण्याकडून माणसात आलेला हा विषाणूचा पुन्हा प्राण्यांमध्ये संसर्ग होईल काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र हा विषाणू अधिक शक्तिशाली होऊन वेगाने पसरत असला तरी माणसांकडून प्राण्यांमध्ये याचा संसर्ग होणे शक्य नाही, असे मत झुनोसिसबाबत अभ्यास करणाऱ्या पशुतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
प्राण्यांकडून माणसांना किंवा माणसांकडून प्राण्यांना होणारे आजार म्हणजेच झुनोसिस. याबाबत प्रसिद्ध व्हेटरनरी सर्जन व पशुपक्षी तज्ज्ञ डॉ. हेमंत जैन यांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्फा व बीटा हे दोन कोरोनाचे जीन्स आहेत. यातील बीटाचे सार्स, मार्स आणि सार्स कोविड-२ हे तीन भाग. सार्स कोविड-२ मुळेच कोविड-१९ आजाराचा उगम झाला. त्यांच्या मते प्राण्यांमध्ये कोरोनाचे ‘केनाईन’ व ‘फेलाईन’ हे दोन प्रकार आहेत. ‘केनाईन कोरोना’ हा श्वानांमध्ये तर वाघ, बिबटे, चित्ते या मांजर प्रजातीच्या प्राण्यांना ‘फेलाईन कोरोना’ची लागण होते. श्वानांना होणाऱ्या कोरोनाची लस २० वर्षापासून बाजारात उपलब्ध आहे पण मांजरांना होणाºया कोरोनाची लस भारतात उपलब्ध नाही. प्राण्यांपासून माणसांना किंवा माणसांपासून प्राण्यांना कोरोना होत नाही, असे पशुवैद्यकीय अभ्यास सांगतो. मात्र अमेरिका व युरोपीय देशात कोरोना पॉझिटिव्ह मालकांपासून त्यांचे पाळीव मांजर किंवा श्वानांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेत वाघालाही कोविड-१९ ची लागण झाल्याची बातमी आली होती. मात्र सध्यातरी त्यावर शिक्कामोर्तब झाले नसून संशोधन सुरू असल्याचे डॉ. जैन यांनी स्पष्ट केले.
आधीच कोरोना विषाणूने भयानक रुप धारण करून भारतात थैमान घातले आहे. त्यात पावसाळ्यामुळे त्यात अधिकच वाढ होताना दिसत आहे. सर्दी, खोकला, ताप हे पावसाळ्यातील सामान्य आजार आहेत. मात्र यामुळे कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. त्यातच वातावरण बदलामुळे त्याची तीव्रता अधिक वाढली आहे आणि याच फरकामुळे माणसांचा संसर्ग प्राण्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंताही डॉ. जैन यांनी व्यक्त केली.
सध्यातरी हा संशोधनाचा विषय आहे पण रोग प्रतिकार शक्ती वाढविणे हाच मोठा पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भटकंती करणाऱ्या जनावरांची प्रतिकार शक्ती अधिक असते पण घरी पाळलेले परदेशी प्रजातीचे श्वान किंवा मांजर याबाबत जरा नाजुकच असतात. त्यामुळे लोकांची काळजी वाढली असून लोक लसीकरणाबाबत अधिक सजग झाल्याचे, डॉ. जैन यांनी नमूद केले. मात्र अधिक सावधानता बाळगण्याचे आवाहन त्यांनी लोकमतशी बोलताना केले.