नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिरचीच्या शेतात सोडली जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:47 AM2018-03-20T10:47:08+5:302018-03-20T10:47:16+5:30
यावर्षी हिरव्या मिरचीला अत्यल्प भाव मिळत असून तोडणीचाही खर्च शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून अशात उभ्या मिरचीमध्ये जनावरे सोडण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही. हे वास्तवचित्र सध्या मौदा तालुक्यात जागोजागी पहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मिरचीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भिवापूर तालुक्यासह कुही, मौदा, रामटेक तालुक्यातही मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र यावर्षी हिरव्या मिरचीला अत्यल्प भाव मिळत असून तोडणीचाही खर्च शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून अशात उभ्या मिरचीमध्ये जनावरे सोडण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही. हे वास्तवचित्र सध्या मौदा तालुक्यात जागोजागी पहावयास मिळत आहे.
भिवापूर, कुही तालुक्यानंतर मिरचीची लागवड करणारा तालुका म्हणून मौदा तालुक्याचा क्रमांक आहे. सध्या हिरव्या मिरचीची तोडाई सुरू आहे. मात्र मिरचीला अत्यल्प भाव असल्याने शेतकऱ्यांना तोडणीचा खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. हिरव्या मिरचीला बाजारात १० ते १३ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे भाव मिळत आहे. मिरची तोडाईच्या खर्चाकडे लक्ष दिल्यास ४० ते ४५ किलो मिरची तोडायला दोन मजुरांची गरज पडते. एका मजुराची रोजी ही १२० ते १५० याप्रमाणे ३०० रुपयांपर्यंत मजुरी होते. ती मिरची बाजारापर्यंत पाठविण्याचा वाहतूक खर्च हा १५० ते २०० रुपये येतो. त्यामुळे तोडलेली मिरची विकण्यास पाठविली तर शेतकऱ्यांकडील ५० रुपये अतिरिक्त खर्च होतात. हा हिशेब पाहता शेतकऱ्यांनी आता उभ्या मिरचीमध्ये जनावरांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मिरचीसोबतच भाजीपाल्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.