खुरीच्या लसींअभावी जनावरे मृत्यूच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:12 AM2021-08-27T04:12:52+5:302021-08-27T04:12:52+5:30
राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील बहुतांश जनावरांना ताेंडखुरी व पायखुरीची लागण झाली आहे. त्यामुळे गुरांना चारा ...
राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यातील बहुतांश जनावरांना ताेंडखुरी व पायखुरीची लागण झाली आहे. त्यामुळे गुरांना चारा खाणे व चालण्यासाठी त्रास हाेत आहे. शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये खुरीच्या लसी व औषधांचा तुटवडा असल्याने ही जनावरे आता मृत्यूच्या दारात आहेत. काहींनी ही औषधे व लसी बाजारातून खरेदी करून आणल्या. मात्र, त्या टाेचण्यासाठी दवाखान्यातील कर्मचारी प्रत्येकी ५०० ते ८०० रुपये घेत असल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे.
ताेंडखुरी व पायखुरी हे दाेन्ही साथीचे आजार असून, ते सहसा पावसाळ्यात उद्भवतात. सध्या तालुक्यातील बहुतांश गुरांना या दाेन्ही आजारांची लागण झाली असून, त्याचा प्रसार हाेत आहे. ताेंडखुरीमुळे जनावरांनी चारा खाणे बंद केले आहे. त्यामुळे गुरे अशक्त हाेत असून, वेळीच औषध व लस न मिळाल्यास जनावरे दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांना वाचविण्यासाठी धडपड सुरू केली असून, दुकानांमधून औषधे व लसी खरेदी करायला सुरुवात केली आहे.
शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात लस टाेचण्यासाठी नियमाप्रमाणे पाच रुपये घेणे अपेक्षित आहे. मात्र, कांद्री येथील दवाखान्यात ७०० रुपये घेण्यात आल्याचेही शेतकऱ्याने सांगितले. या दवाखान्यात काही खासगी व्यक्ती काम करतात. या व्यक्ती अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना लुटून त्यांचा महिन्याचा पगार वसूल करतात. ज्या दवाखान्यांच्या हद्दीत अधिक गावे आहेत, त्या दवाखान्यांमध्ये गुरांवर उपचार करण्यासाठी खासगी व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नव्याने उगवलेल्या हिरव्या चाऱ्यामुळे गुरांना खुरीसाेबतच एकटांग्या व घटसर्प हे आजार हाेण्याची शक्यता बळावली आहे.
...
दुधाच्या उत्पादनात घट
रामटेक तालुक्यात दुधाळ जनावरांची संख्या बरीच माेठी आहे. बैलांसह दुधाळ गायी व म्हशींना ताेंडखुरी व पायखुरीची माेठ्या प्रमाणात लागण झाली आहे. ताेंडखुरीमुळे या गुरांनी चारा खाणे बंद केले आहे. त्याचा परिणाम दुधाच्या उत्पादनावर झाला असून, ते आठवडाभरात कमालीचे घटले आहे.
...
ऑक्टाेबरमध्ये मिळणार लस
ताेंडखुरी व पायखुरी या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पावसाळ्याच्या ताेंडावर गुरांना दाेन्ही आजाराच्या लसी देणे अनिवार्य असते. परंतु, यावर्षी गुरांचे लसीकरण करण्यात आले नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली असून, याला पशुवैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांनी दुजाेरा दिला आहे. सध्या लसी उपलब्ध नाहीत. त्या ऑक्टाेबरमध्ये उपलब्ध हाेतील, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
...
लस टाेचण्याचा खर्च ७०० रुपये
शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात लस उपलब्ध नसल्याने आपण ती ३० मिलीची बाटली ४०० रुपयांत खरेदी केली. ही लस टाेचण्यासाठी जनावराला घेऊन कांद्री (ता. रामटेक) येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात गेलाे. तेथील कर्मचाऱ्याने एक लस टाेचण्यासाठी ७०० रुपये घेतल्याची माहिती शेतकऱ्याने दिली.