अनिरुद्ध जोशी ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा महाविजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:28 AM2018-04-09T05:28:25+5:302018-04-09T05:28:25+5:30
जन्मजात लाभलेला गोड गळा अन् गायनातील नावीन्यपूर्ण प्रयोगांमुळे महाराष्ट्र संगीत रत्न, सारेगमप यासारख्या मोठ्या स्पर्धा जिंकणाऱ्या अनिरुद्ध जोशी या नागपूरकराने शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
नागपूर : जन्मजात लाभलेला गोड गळा अन् गायनातील नावीन्यपूर्ण प्रयोगांमुळे महाराष्ट्र संगीत रत्न, सारेगमप यासारख्या मोठ्या स्पर्धा जिंकणाऱ्या अनिरुद्ध जोशी या नागपूरकराने शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. एका मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेचा तो महाविजेता ठरला आहे.
८ एप्रिलला मुंबईमध्ये झालेल्या महाअंतिम फेरीत परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मते याच्या जोरावर अनिरुद्ध अव्वल ठरला. नागपूरकर रसिकांनी अनिरुद्धला भरभरून मते दिली. महाअंतिम फेरीत अनिरुद्धबरोबर निहिरा जोशी, शरयू दाते, प्रसेनजित कोसंबी आणि विश्वजित बोरवणकर हे स्पर्धक होते. स्पर्धेचे परीक्षण महेश काळे, अवधूत गुप्ते आणि शाल्मली खोलगडे यांनी केले. पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सचिन पिळगावकर हे महाअंतिम सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. अनिरुद्धने सुरवातीपासून अप्रतिम गाणी सादर करून पाच वेळा कट्यार मिळविली होती.
>स्वप्न साकार झाले
ही स्पर्धा माझ्यासाठी एक मोठे स्वप्न होते. महाविजेता ठरल्याने स्वप्न साकार झाले आहे. यापुढे गायक आणि संगीतकार म्हणून मला कारकीर्द घडवायची आहे. माझ्या या सांगितिक प्रवासात नागपूरकर रसिकांनी मला नेहमीच साथ दिली आहे. नागपूरकरांचे माझ्यावरील हे प्रेम बघून मी भारावून गेलो आहे.
- अनिरुद्ध जोशी