नागपुरात अनिरुद्ध-रसिकाने रसिकांना जिंकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:08 PM2018-02-20T23:08:02+5:302018-02-20T23:16:40+5:30
सारेगमप स्पर्धेचा महाविजेता व नागपूरकरांचा आवडता गायक अनिरुद्ध जोशी याच्या पुढील प्रवासासाठी रसिकांचे आशीर्वाद व शुभेच्छांचे पाठबळ लाभावे, याकरिता मंगळवारी सायंटिफिक सभागृहात अनिरुद्धचे लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सारेगमप स्पर्धेचा महाविजेता व नागपूरकरांचा आवडता गायक अनिरुद्ध जोशी याच्या पुढील प्रवासासाठी रसिकांचे आशीर्वाद व शुभेच्छांचे पाठबळ लाभावे, याकरिता मंगळवारी सायंटिफिक सभागृहात अनिरुद्धचे लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. एकूण १६ गाण्यांच्या या सुरेल प्रवासात अनिरुद्ध जोशी व रसिका चाटी यांच्या मधूर आवाजाने रसिकांना जिंकले. अॅड. भानुदास कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून स्वरवेधने सादर केलेल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ गुणीबाळ असा...या रसिकाच्या गीताने झाला. यानंतर अनिरुद्धने यमन बंदिश अतिशय तन्मयतेने सादर केली. माझे माहेर पंढरी...हे त्याच्या आवाजातील भजन ऐकताना श्रोत्यांची जणू ब्रह्मानंदी टाळी लागली. शुक्रतारा मंदवारा...हे युगल गीतही छान जमून आले. खंडेरायाच्या लग्नाला....या अनिरुद्धच्या खड्या आवाजातील गाण्याने माहोल केला. सर्वात्मका सर्वेश्वरा...या गीताने या मैफिलीचा समारोप झाला. मुकुंद देशपांडे यांनी अनिरुद्ध व रसिकाला त्यांच्या सांगितिक प्रवासाबद्दल बोलते केले. या दोन्ही गायकांना सचिन बक्षी, अॅड. भानुदास कुलकर्णी, आनंद मास्टे, नरेंद्र कडबे, प्रसन्न वानखेडे, पंकज यादव, सुभाष वानखेडे, विक्रम जोशी व अभिषेक दहीकर यांनी वाद्यांवर सुरेल सहसंगत केली.
ढिसाळ नियोजनाने गुदमरला श्वास
स्वरवेध ही संस्था नियोजनबद्ध कार्यक्रमासाठी ओळखली जाते. कुठल्याही औपचारिकतेशिवाय ठरलेल्या वेळेत कार्यक्रम सुरू करण्याचा या संस्थेचा शिरस्ताही रसिकांना फार भावतो. परंतु अनिरुद्धच्या लाईव्ह इन कॉन्सर्टमध्ये नियोजनाचा पार बोजवारा उडाला. कार्यक्रम नि:शुल्क असल्याने श्रोत्यांची गर्दी अपेक्षितच होती. परंतु तरीही हा कार्यक्रम सायंटिफिकसारख्या छोट्या सभागृहात घेण्यात आला. परिणामी श्रोत्यांना बसायला तर सोडा उभे राहायलाही जागा नव्हती. गर्दीत श्वास गुदमरत असल्याने अनेकांनी थेट घरचा रस्ता धरला, तर जे बाहेर उभे होते त्यांना शेवटपर्यंत केवळ श्रवणावरच समाधान मानावे लागले. काही श्रोत्यांमध्ये तर जागेवरून वादही झालेत. या कार्यक्रमातून बोध घेऊन पुढच्या वेळी रसिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी स्वरवेधने घ्यावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत कार्यक्रम न बघताच अनेकांनी सभागृह सोडले.