दोन दिवसानंतर काेल्हापुरी बंधाऱ्यात आढळला अंजलीचा मृतदेह; पुरात आईसह गेली होती वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 10:35 AM2022-07-13T10:35:44+5:302022-07-13T10:41:06+5:30
दोघी माय-लेकी रविवारी रात्री हाॅटेलमधील काम आटाेपून पायी घरी येत हाेत्या. त्यांच्या घराजवळ असलेल्या नाल्याचा पूर ओलांडत असताना दाेघीही प्रवाहात आल्या आणि वाहत गेल्या.
हिंगणा (नागपूर) : नाल्याचा पूर ओलांडताना आई व मुलगी वाहून गेल्याची घटना इसासनी, ता. हिंगणा येथे रविवारी (दि. १०) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली हाेती. यातील आईचा मृतदेह रविवरी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आढळून आला. मुलीचा मृतदेह मात्र गवसला नव्हता. त्यामुळे पाेलिसांनी तिचा शाेध घेतला असता मंगळवारी (दि. १२) दुपारी या नाल्यावरील काेल्हापुरी बंधाऱ्यात तिचा मृतदेह आढळून आला.
सुकवन राधेलाल मातरे (४५) व अंजली राधेलाल मातरे (१७), रा. भीमनगर, इसासनी, ता. हिंगणा अशी मृतांची नावे आहेत. त्या दाेघीही रविवारी रात्री हाॅटेलमधील काम आटाेपून पायी घरी येत हाेत्या. त्यांच्या घराजवळ असलेल्या नाल्याचा पूर ओलांडत असताना दाेघीही प्रवाहात आल्या आणि वाहत गेल्या. दरम्यान, रविवारी रात्री सुकवन हिचा मृतदेह तिच्या घरापासून एक किमी अंतरावर आढळून आला. शिवाय, पाेलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अंजलीचे शाेधकार्य सुरू केले.
साेमवारी (दि. ११) दिवसभर शाेध घेऊन तिचा मृतदेह आढळून आला नव्हता. त्यामुळे पाेलिसांनी मंगळवारी (दि. १२) पुन्हा शाेधकार्य सुरू केले. या नाल्यावर असलेल्या काेल्हापुरी बंधाऱ्यात दुपारी तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. यावेळी उमेश बेसरकर, नायब तहसीलदार नीलेश कदम यांच्यासह कर्मचारी उपस्थित हाेते. पाेलिसांनी मृतदेह बाहेर काढून हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी एमआयडीसी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
पहिल्याच पावसात दाेन बळी
इसासनी येथील वाहणाऱ्या नाल्यावर अतिक्रमण करून घरांचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे या संपूर्ण भागातील पावसाचे पाणी वाहून जाण्याची समस्या निर्माण झाली. या अतिक्रमणाला व नाल्याचे अस्तित्व धाेक्यात आणण्याला स्थानिक प्रशासनाचे मूकसमर्थन कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे यावर्षी पहिल्याच पावसात दाेघींचे बळी गेले आहेत.