अंजनी लॉजिस्टिकला मिहानमध्ये चार एकर जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:07 AM2021-09-25T04:07:58+5:302021-09-25T04:07:58+5:30
नागपूर : लहान-मोठ्या निर्मिती प्रकल्पांनी मिहान-सेझकडे पाठ फिरविली आहे, तर दुसरीकडे गृह आणि व्यावसायिक संकुल उभारण्यासाठी बिल्डरांची मिहानला पहिली ...
नागपूर : लहान-मोठ्या निर्मिती प्रकल्पांनी मिहान-सेझकडे पाठ फिरविली आहे, तर दुसरीकडे गृह आणि व्यावसायिक संकुल उभारण्यासाठी बिल्डरांची मिहानला पहिली पसंती दिसून येत असल्याचे दिसून येत आहे. यातच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) नागपुरातील अंजली लॉजिस्टिकला खापरी मेट्रो स्टेशनजवळ चार एकर जागा मंजूर केली आहे. कंपनीच्या नावापुढे लॉजिस्टिक असले तरीही कंपनी गृह व व्यावसायिक संकुल उभारणार आहे. यातून रोजगार निर्मिती होणार नाही.
निविदाप्रक्रियेत अंजनी लॉजिस्टिक्स कंपनीने सर्वात जास्त दर दिल्याने हा भूखंड कंपनीला देण्यात आला आहे. हा प्रकल्प खापरी मेट्रो रेल्वे स्टेशनलगत असल्यामुळे नागपूर शहर व परिसरातील लोक येथे निर्माण होणाऱ्या नवीन मॉल, शॉप्स इत्यादी सुविधांचा लाभ घेऊ शकतील. यामुळे मिहानमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक वाढून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मिहानमध्ये अद्ययावत पायाभूत सुविधा व उद्योगपूरक वातावरण असल्यामुळे बऱ्याच कंपन्यांनी मिहानमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. अनेकांनी उत्पादनही सुरू केले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली असून, मिहान हे आयटी, एव्हिएशन आणि ॲग्रो बिझनेस हब म्हणून उदयास येत असल्याचे एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी म्हटले आहे.
वाढत्या रोजगारामुळे मिहानमध्ये निवासी गृहसंकुल तसेच दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी व्यावसायिक संकुलांची गरज मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सध्या महिंद्रा, मोराज व एनआयटीपीएल या बांधकाम व्यावसायिकांनी गृहसंकुल प्रकल्प मिहानमध्ये उभारले आहेत. एचसीएल कंपनीनेसुद्धा कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी गृहसंकुल उभारण्यासाठी सुमारे २० एकर जागा संपादित केली आहे. या सर्वांमुळे सुमारे ५ ते ७ हजार घरे नजीकच्या काळात उपलब्ध होऊ शकतील. रोजगार, व्यवसाय, निवासी सुविधा तसेच दैनंदिन गरजांच्या वस्तूंची उपलब्धता एकाच परिसरात उपलब्ध होत असल्याने मिहान हे सर्व सुविधांयुक्त ठिकाण म्हणून नावारूपास येत आहे.