अण्णाभाऊंच्या साहित्याने दिला शोषणाविरुद्धचा विचार
By admin | Published: February 12, 2017 02:25 AM2017-02-12T02:25:12+5:302017-02-12T02:25:12+5:30
श्रेष्ठतेच्या कल्पनेतून उच्चवर्णीयांनी आपल्याच समाजबांधवांना हजारो वर्षे गावाबाहेर ठेवले. त्यांच्याकडून
नागपूर : श्रेष्ठतेच्या कल्पनेतून उच्चवर्णीयांनी आपल्याच समाजबांधवांना हजारो वर्षे गावाबाहेर ठेवले. त्यांच्याकडून स्वच्छतेची कामे करून घेताना त्यांना मात्र कायम अज्ञानात आणि अस्वच्छतेतच राहू दिले. अशा सगळ्याच संधी नाकारलेल्या समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीद्वारे क्रांती घडवली. अनेक कादंबऱ्या, नाटके, कथा लिहिल्या. आपल्या कर्तृत्वावर रशियाचा प्रवास केला. दलित समाजाला जागृत करण्यासोबतच अण्णाभाऊंच्या साहित्याने शोषणाविरुद्धचा विचार देशाला दिला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले. माहेश्वरी सांस्कृतिक सभागृहात आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे दुसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष डॉ. गिरीश गांधी व प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी, डॉ. माधवराव गादेकर, डॉ. ईश्वर नंदपुरे, डॉ. विठ्ठल भंडारे उपस्थित होते. डॉ. अशोक कांबळे यांनी संमेलनाची भूमिका मांडली. प्रास्ताविक चंद्रकांत वानखेडे, संचालन संजय ठोसर तर आभार प्रकाश डोंगरे यांनी मानले. उद्घाटनाआधी सकाळी ९ वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या ग्रंथांची विचारयात्रा काढण्यात आली. दुसऱ्या सत्रात सकाळी १० वाजता शंकरराव ठोसर व त्यांच्या चमूने गीतगायन सादर केले. दुपारी ४ वाजता ‘मराठी साहित्य व संस्कृतीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे योगदान’ या विषयावर परिसंवाद पार पडले. संमेलनाच्या पाचव्या सत्रात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत व नीलकांत ढोले यांच्या उपस्थितीत कविसंमेलन झाले. उद्या रविवारी या संमेलनात परिसंवाद, प्रबोधनात्मक नाटिका व कथाकथनाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)