शिक्षक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष अण्णाजी मेंडजोगे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 09:13 PM2019-03-15T21:13:53+5:302019-03-15T21:15:23+5:30
शिक्षक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष व सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारे सहकार महर्षी मनोहर नरहर उपाख्य अण्णाजी मेंडजोगे यांचे १५ मार्चला निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात तीन मुली व मुलगा आहे. अंत्ययात्रा १६ मार्चला सकाळी ९.३० वाजता संती रोड, इतवारी हायस्कूल या त्यांच्या निवासस्थानावरून निघून गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष व सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारे सहकार महर्षी मनोहर नरहर उपाख्य अण्णाजी मेंडजोगे यांचे १५ मार्चला निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात तीन मुली व मुलगा आहे. अंत्ययात्रा १६ मार्चला सकाळी ९.३० वाजता संती रोड, इतवारी हायस्कूल या त्यांच्या निवासस्थानावरून निघून गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अण्णाजी मेंडजोगे यांचा जन्म १० एप्रिल १९३१ रोजी हिंगणा येथे झाला. शिक्षणासाठी ते नागपुरात आले व येथेच स्थायिक झाले. प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी १९५१ पासून शिक्षकी पेशा पत्करला व आजीवन विद्यादानाचे कार्य केले. त्यांनी शिक्षक परिषदेची स्थापना केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यांनी भारतीय जनसंघाचेसुद्धा अनेक वर्ष कार्य केले. त्यांचे सहकार क्षेत्रात भरीव योगदान होते. सहकार हा त्यांचा आवडता विषय होता. १९७५ साली शिक्षक सहकारी बँकेची स्थापना केली. त्यांचे बँकेतील व्यवहारांवर व रिझर्व्ह बँकेच्या धोरणांवर बारीक लक्ष होते. सहकार क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले.
माझ्या जीवनावर त्यांच्या कर्तबगारीचा प्रभाव होता. आपुलकीने विचारपूस करणारा व पुत्रवत प्रेम करणाऱ्या सच्चा मार्गदर्शकाला आम्ही मुकलो आहे. शिक्षक सहकारी बँकेच्या वाढीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. आमचे आदर्श आमच्यातून निघून गेले, अशा शब्दात भावना व्यक्त करीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना अभिवादन केले.