तामिळनाडूतील अण्णा टोळीचा ४८ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 09:31 PM2019-02-02T21:31:58+5:302019-02-02T21:33:05+5:30

येथील एका व्यापाऱ्याच्या मदतीने तामिळनाडूतील अण्णा टोळीने गांधीबागमधील कपड्याच्या ठोक व्यापाऱ्याला ४८ लाखांचा गंडा घातला. एक वर्षापासून आपली रक्कम परत मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यापाऱ्याने अखेर पोलिसांकडे तक्रार नोंदविली.

Anna's gang of Tamil Nadu cheated Rs 48 lakhs | तामिळनाडूतील अण्णा टोळीचा ४८ लाखांचा गंडा

तामिळनाडूतील अण्णा टोळीचा ४८ लाखांचा गंडा

Next
ठळक मुद्देनागपुरातील गांधीबागमधील व्यापाऱ्याची फसवणूक : तहसीलमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येथील एका व्यापाऱ्याच्या मदतीने तामिळनाडूतील अण्णा टोळीने गांधीबागमधील कपड्याच्या ठोक व्यापाऱ्याला ४८ लाखांचा गंडा घातला. एक वर्षापासून आपली रक्कम परत मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यापाऱ्याने अखेर पोलिसांकडे तक्रार नोंदविली.
दिनेश दिवानचंद आहुजा (वय ३७) असे तक्रार करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. तहसीलमधील देवधर मोहल्ल्यात त्यांचे रेडिमेड कपड्याचे दुकान आहे. ते होलसेल कपड्याचा व्यापार करतात.
सप्टेंबर २०१७ मध्ये मूळचा बिकानेर राजस्थान येथील रहिवासी असलेला आणि सध्या गांधीबागमध्ये राहणारा रामसिंग मंगलसिग सोडा (वय ३५) हा आरोपी त्यांच्याकडे आला. त्याने आहुजा यांच्याशी किरकोळ कपड्याचा व्यवहार करून त्यांच्याशी सलगी वाढविली. नंतर मोहना सुंदरम टी. ऊर्फ बाबू (वय ३२, रा. कल्लाप निवास, तिरुपूर, तामिळनाडू), रविशंकर एम. षण्मोगम (वय ३२, रा. अंबर मुरुगन मुथूर, उजय तामिळनाडू) आणि राजकुट्टी टी. मुरली (वय ४०, रा. हरिहरन कॉम्प्लेक्स सेलम, तामिळनाडू) या आरोपींना घेऊन आला. त्यांनी संगनमत करून आपली तामिळनाडूत मोठी कंपनी असल्याची थाप मारून तसे व्हिजिटिंग कार्ड आहुजा यांना दिले. त्यांच्याकडून प्रारंभी छोट्या रक्कमेचे कपडे घेतले. त्यानंतर ओळखी वाढवत सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत ४८ लाख १९ हजारांचा रेडिमेड सूटचा माल उधारीवर नेला. ते कपडे त्यांनी दुसºया व्यापाऱ्यांना कमी पैशात विकले. परंतु ठरल्याप्रमाणे आहुजा यांना त्यांच्या कपड्याची रक्कम आणून दिली नाही. एक वर्षापासून आरोपी रक्कम परत करण्यास टाळाटाळ करीत होते. त्यांनी फसवणूक केल्याची आणि ती आपली रक्कम परत करणार नाही, अशी खात्री पटल्याने अखेर आहुजा यांनी तहसील ठाण्यात धाव घेतली.
उपायुक्तांनी घेतली दखल
पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी चौकशीच्या नावाखाली टाइमपास चालविल्याने आहुजा यांनी परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांची भेट घेतली. त्यांना फसवणुकीचा प्रकार समजावून सांगितला. त्याची माकणीकर यांनी लगेच दखल घेत तहसील पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, शुक्रवारी तहसील पोलिसांनी आहुजा यांच्या तक्रारीवरून उपरोक्त चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांची चौकशी केली जात आहे.

Web Title: Anna's gang of Tamil Nadu cheated Rs 48 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.