हिंदी राज्य नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 09:26 PM2020-06-01T21:26:30+5:302020-06-01T21:28:33+5:30
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य हिंदी नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करा, अशा मागणीसाठी राज्यभरातून रंगकर्मी एकवटत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य हिंदी नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करा, अशा मागणीसाठी राज्यभरातून रंगकर्मी एकवटत आहेत.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ५९वी राज्य हिंदी नाट्यस्पर्धा पार पडली. नेहमीपेक्षा या स्पर्धेचे स्वरूप वेगळे होते. एकाच केंद्रावर न घेता ही स्पर्धा विभागीय स्वरूपात घेण्यात आली. त्यानुसार एकूण ८६ नाटके विभागवार पद्धतीने अंतिम फेरीत उतरणार होते. जानेवारीपासून नाट्यस्पर्धेस सुरुवात झाली. पुणे, नागपूर, ठाणे आणि मुंबई अशा तऱ्हेने ही स्पर्धा होणार होती. मात्र, पुणे, नागपूर व ठाणे येथे स्पर्धा आटोपली आणि मुंबईला स्पर्धा पोहोचताच कोरोनाचा प्रकोप प्रचंड वाढला आणि स्पर्धा स्थगित करण्यात आली. त्याअनुषंगाने पुणे केंद्रावर २३ पैकी २०, नागपूर केंद्रावर २० पैकी १७, ठाणे केंद्रावर १३ पैकी १२ आणि मुंबई केंद्रावर ७ नाटकांचे सादरीकरण झाले. मुंबई केंद्रावर स्पर्धेतील २५ नाटके सादर होणे राहिले आहे. अशात २० मार्चपासून राज्यात टाळेबंदी सुरू झाली आणि त्यापूर्वीपासूनच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन रद्द करण्याच्या घोषणा झाल्या. अशा तऱ्हेने स्पर्धेत सादर होणाऱ्या ८६ पैकी ५६ नाटकांचे सादरीकरण झाले. उर्वरित नाटके होण्याची चिन्हे नाहीत. ही सर्व नाटके मुंबई केंद्रावरची असल्याने आणि मुंबईची स्थिती बघता ही स्पर्धा पूर्ण होणे अत्यंत अवघड आहे. अशा स्थितीत स्पर्धेत जेवढी नाटके झाली, त्यांचा निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. अन्यथा सादर झालेल्या नाटकांवर अन्याय होईल. याच भावनेतून राज्यातील ५६ नाट्यसंघांनी ‘कोरोनापीडित नाट्यस्पर्धा’ या शीर्षकाखाली एकत्र येण्याचा प्रयत्न चालवला आहे.