नागपूर विभागात १३ हजार सिंचन विहिरी बांधणार : पालकमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:15 AM2019-02-12T00:15:14+5:302019-02-12T00:16:35+5:30

विभागात पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी १३ हजार सिंचन विहिरी बांधण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. या कार्यक्रमामुळे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Announcement of Guardian Minister: 13 thousand irrigation wells in Nagpur division | नागपूर विभागात १३ हजार सिंचन विहिरी बांधणार : पालकमंत्र्यांची घोषणा

नागपूर विभागात १३ हजार सिंचन विहिरी बांधणार : पालकमंत्र्यांची घोषणा

Next
ठळक मुद्देनागपूर, भंडाऱ्यातील पेंच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विभागात पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी १३ हजार सिंचन विहिरी बांधण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. या कार्यक्रमामुळे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
सिंचन विहीर बांधण्याचा कार्यक्रम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर व भंडारा येथे १० हजार तर दुसऱ्या टप्प्यात गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्हा तीन हजार विहिरी बांधण्यात येतील. नागपूर जिल्ह्यातील पेंच लाभक्षेत्रासाठी साडेचार हजार तर शेतकऱ्यांसाठी ५०० विहिरी बांधण्यात येतील. सर्व धडक सिंचन विहिरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. धडक सिंचन विहिरी मंजूर करताना लाभक्षेत्रातील पाच एकरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच ५ ते १० एकर शेती असणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सिंचन विहिरी मंजूर करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात येणार असून, प्रत्येक विहिरीसाठी अडीच लाख रुपये याप्रमाणे निधी देण्यात येणार आहे. धडक सिंचन विहिरीच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी ३३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यासाठी तरतूदही उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. या योजनेचा जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यावेळी आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे उपस्थित होते.
‘वेकोलि’चे पाणी पेंचमध्ये जमा करणार
पेंच प्रकल्पात जलसाठ्यात घट झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह आरक्षणानुसार प्राधान्य क्रमांक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी उपसा जलसिंचन योजना सुरू करण्यात येणार आहे. तसेच वेस्टर्न कोल फील्डच्या खाणीमधून वाहून जाणारे सर्व पाणी पेंच प्रकल्पामध्ये जमा करण्याच्या दृष्टीने १२०० कोटी रुपयाचा आराखडा राबविण्यात येत असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.
अगोदरच्या कार्यक्रमाचे ‘जियोटॅगिंग’ पूर्ण
धडक सिंचन विहिरींच्या विशेष कार्यक्रमानुसार यापूर्वी ११ हजार विहिरींचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. यात नागपूर जिल्ह्याला ५०० विहिरींचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ४९५ विहिरींची कामे पूर्ण झाली असून, यावर ११ कोटी ८१ लाख रुपये खर्च झाले असून, याअंतर्गत लाभ मिळालेल्या धडक सिंचन विहिरी जियोटॅगिंग पूर्ण करण्यात आले आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यात ५,७२२ सिंचन विहिरींच्या कामाला सुरुवात झाली असून, त्यापैकी ४,८७६ विहिरी पूर्ण झाल्या आहेत.

 

Web Title: Announcement of Guardian Minister: 13 thousand irrigation wells in Nagpur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.