नागपुरातील जम्बो हॉस्पिटलची घोषणा फसवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 09:40 AM2020-09-08T09:40:57+5:302020-09-08T09:41:36+5:30
३५ लाख लोकसंख्या असलेल्या नागपुरात मेयो, मेडिकलमधील १२०० खाटांचे कोविड हॉस्पिटल सोडल्यास प्रशासन दुसरे कोविड हॉस्पिटल उभे करू शकले नाही.
सुमेध वाघमारे
नागपूर : मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भावाला सुरूवात झाली. परंतु या सहा महिन्यांच्या काळात प्रशासनाने के वळ कागदी घोडे नाचविल्याचे दिसून येते. ३५ लाख लोकसंख्या असलेल्या नागपुरात मेयो, मेडिकलमधील १२०० खाटांचे कोविड हॉस्पिटल सोडल्यास प्रशासन दुसरे कोविड हॉस्पिटल उभे करू शकले नाही. १६ ऑगस्ट रोजी पालकमंत्री नितीन राऊत यांनी अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असे हजार खाटांचे ‘जम्बो कोविड रुग्णालय’ मानकापूर येथे उभारण्याची घोषणा के ली. परंतु नंतर अधिकाऱ्यांनी या घोषणेला मनावर घेतले नाही. परिणामी, महिना होत असताना एक खाटही लागली नाही. कोरोनाचा रुग्णांशी सुरू असलेला हा खेळ थांबणार तरी कधी, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
नागपूर जिल्ह्यात रोज साधारण १५००वर कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. ४० ते ५० रुग्णांचा जीव जात आहे. कोरोनाच्या या दहशतीमुळे जीवाचा थरकाप उडत आहे. हे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले असताना प्रशासन बैठका घेण्यापुरतेच मर्यादित असल्याचे चित्र आहे. शहरात मेयो, मेडिकल सोडल्यास शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, कामगार विमा रुग्णालय, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, महानगरपालिकेचे तीन मोठे हॉस्पिटल आहेत. परंतु आजही हे हॉस्पिटल कोविड रुग्णांपासून दूर आहेत. कोरोनाच्या सहा महिन्याच्या काळात याच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन लाईन व आवश्यक सोयीसुविधा उभ्या केल्या असता तर आज कोरोनाबाधितांवर उपचारासाठी दारोदार भटकण्याची वेळ आली नसती, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-‘जम्बो’ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घोषणा
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात १६ ऑगस्ट रोजी ‘जम्बो कोविड हॉस्पिटल’च्या संदर्भात पालकमंत्री राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एएए हेल्थ कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे डॉ. अहमद मेकलाई, डॉ. अमृता सूचक, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी आदी सर्व मोठे म्हणजे ‘जम्बो’ अधिकारी उपस्थित होते. विदर्भातील वाढत्या कोविड रुग्णांसाठी अतिरिक्त तसेच तातडीची आरोग्य सुविधा निर्माण करणे तसेच शासकीय रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी या हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येते, अशी पुष्टीही पालकमंत्री राऊत यांनी दिली होती. परंतु नंतर पुढे काय झाले, याचे उत्तर अद्यापही कुणाकडेच नाही.
-मनपा आयुक्तांनी दाखविला जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना ‘जम्बो कोविड हॉस्पिटल’बाबत विचारले असता, या हॉस्पिटलची माहिती माझ्याकडे नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. त्यांना विचारा, असे उत्तर दिले.
::रुग्णांनी जावे कुठे
-मेडिकल ३७८ रुग्ण (ऑक्सिजनच्या रुग्णांना भरती नाही)
-मेयो ४२३ रुग्ण (१७७ खाटा शिल्लक)
-एम्स ३७ रुग्ण (ऑक्सिजनच्या खाटा फु ल्ल)
__-२७ खासगी हॉस्पिटल : १३९३ रुग्ण (खाटा फु ल्ल)