रेल्वेकडून समर स्पेशल गाड्यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:06 AM2021-06-04T04:06:48+5:302021-06-04T04:06:48+5:30
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागताच रेल्वे प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे. अशात रेल्वेकडून समर स्पेशल ट्रेन चालविण्याचा ...
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागताच रेल्वे प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे. अशात रेल्वेकडून समर स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नागपूरमार्गे सिकंदराबाद-छपरा समर स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे.
रेल्वेच्या दृष्टीने उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईचा हंगाम महत्त्वाचा आहे. परंतु, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्षे रेल्वेला पुरेसे प्रवासीच मिळू शकले नाही. आता देशभरातून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. बंधने शिथिल होत असल्याने मजूरवर्ग आपापल्या कामाच्या ठिकाणी जायला निघाला आहे. परिणामी रेल्वे प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे रेल्वेनेही गाड्यांची संख्या वाढविण्याची तयारी केली आहे. त्यानुसार नागपूरमार्गे सिकंदराबाद-छपरा विशेष रेल्वेगाडी चालविली जाणार आहे. ०७०५१ सिकंदराबाद-छपरा समर स्पेशल ६ ते २७ जूनदरम्यान प्रत्येक रविवारी रात्री ९.३५ वाजता सिकंदराबाद येथून रवाना होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि तिसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी ३.२५ वाजता छपराला पोहोचेल, तर रेल्वेगाडी क्रमांक ०७०५२ छपरा-सिकंदराबाद स्पेशल ट्रेन ८ ते २९ जूनदरम्यान प्रत्येक मंगळवारी रात्री ११.३० वाजता छपरा येथून रवाना होईल. ही गाडी तिसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ६.४० वाजता नागपूरला पोहोचेल आणि दुपारी ४.३० वाजता सिकंदराबादला पोहोचेल. या गाडीला पाच तृतीय श्रेणी वातानुकूलित, १० स्लिपर आणि ६ जनरल कोच राहतील.
.............