विदर्भ साहित्य संघाचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर

By admin | Published: December 31, 2015 03:25 AM2015-12-31T03:25:49+5:302015-12-31T03:25:49+5:30

विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी साहित्यिकांना प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

Announces literary award for Vidarbha Sahitya Sangha | विदर्भ साहित्य संघाचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर

विदर्भ साहित्य संघाचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर

Next

लोकमतचे पाणूरकर यांच्यासह खोब्रागडे, नरांजे मानकरी
नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी साहित्यिकांना प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हे पुरस्कार १४ जानेवारी रोजी संस्थेच्या ९३ व्या वर्धापनदिन समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.
दिवंगत ज्येष्ठ साहित्यिकांच्या नावाने प्रदान करण्यात येणाऱ्या या पुरस्कारांमध्ये पु. य. देशपांडे स्मृती कादंबरी पुरस्कार भाऊ गावंडे यांच्या ‘वांझुठाव’ या कांदबरीला प्राप्त झाला असून, डॉ. राजेंद्र डोळके यांच्या ‘साहित्य संचार’ या ग्रंथासाठी कुसुमानील स्मृती समीक्षा पुरस्कार प्राप्त झाला आहे. गो. रा. दोडके स्मृती ललितलेखन पुरस्काराचे मानकरी ‘आणखी एक पाऊल’ या पुस्तकासाठी ई. झेड. खोब्रागडे आणि शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती काव्य पुरस्काराच्या मानकरी ‘रक्तकमळ’ काव्यसंग्रहासाठी ऊर्मिला निनावे ठरल्या आहेत. वा. कृ. चोरघडे स्मृती कथा पुरस्कार एकनाथ तट्टे आणि फागुन या कथासंग्रहासाठी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती चरित्र पुरस्कार डॉ. मनोहर नरांजे यांना ‘बैरागड’ या ग्रंथासाठी देण्यात येणार आहे. हरिकिशन अग्रवाल स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी लोकमतचे उपसंपादक राजेश पाणूरकर यांची निवड करण्यात आली आहे. नवोदित साहित्याचे दोन पुरस्कार गणेश भाकरे यांना ‘आसवाची शाई’ कवितासंग्रहासाठी आणि ओंकार नंदनवार यांना ‘अरण्यओढ’ पुस्तकासाठी देण्यात येणार आहे. नाट्यलेखनाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबाबत बळवंत लामकाणे यांना नाना जोग नाट्य लेखन पुरस्कार तर बालसाहित्यातील योगदानाबाबत मालविका देखणे यांना बा. रा. मोडक स्मृती बालसाहित्य लेखन पुरस्कार प्रदान करण्यात येईल. संस्थेच्या सरचिटणीस शोभाताई उबगडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट शाखा पुरस्काराची मानकरी लाखनी शाखा ठरली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त उत्कृष्ट वाचक पुरस्कार केशव मुळे यांना प्रदान करण्यात येईल, असे संस्थेचे सरचिटणीस डॉ. विलास चिंतामण देशपांडे यांनी कळविले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Announces literary award for Vidarbha Sahitya Sangha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.