वैतागलेल्या शेतमालकाकडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:41+5:302021-05-31T04:07:41+5:30
प्रशासनात प्रचंड खळबळ : पोलिसांकडून उमरेडच्या व्यक्तीची चौकशी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासनाने अधिग्रहित केलेल्या शेतजमिनीसंदर्भातील वादात न्याय ...
प्रशासनात प्रचंड खळबळ : पोलिसांकडून उमरेडच्या व्यक्तीची चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाने अधिग्रहित केलेल्या शेतजमिनीसंदर्भातील वादात न्याय मिळत नसल्याची भावना झाल्याने वैतागलेल्या एका शेतजमीन मालकाने थेट मंत्रालय उडवून देण्याचा फोन मुंबईत केला. त्यामुळे रविवारी दुपारपासून राज्यभर खळबळ उडाली. हादरलेल्या पोलीस प्रशासनाने संबंधित व्यक्तीची चौकशी चालवली आहे. सागर काशिनाथ मांढरे (४०) असे त्यांचे नाव असून ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील मंत्रालयात बॉम्ब पेरण्यात आला असून मंत्रालय उडवून देणार असल्याचा फोन कॉल रविवारी दुपारी मुंबईत करण्यात आला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. चौकशीत हा फोन कॉल नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथून करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांनी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी संपर्क साधला. पोलीस अधीक्षक ओला यांनी लगेच आपली यंत्रणा कामी लावली. उमरेड परिसरातील सागर मांढरे यांना शोधून काढून सायंकाळी त्यांची चौकशी सुरू केली.
सूत्रांच्या माहितीनुसार, तो फोन आपणच केल्याचे मांढरे यांनी कबूल केले. त्यामागची पार्श्वभूमी सांगताना ते म्हणाले की, जिल्ह्यातील उमरेडजवळच्या मकरधोकडा येथे आमची शेतजमीन होती. जी १९९६ मध्ये शासनाने (वेकोली) अधिग्रहित केली. परंतु त्याचा योग्य तो मोबदला मिळाला नाही. यासंबंधाने गेल्या २४ वर्षांपासून ते शासनासोबत पत्रव्यवहार करत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडे अपीलही केले. मात्र कुठूनच न्याय मिळत नसल्यामुळे आपल्याला प्रचंड नैराश्य आल्याचे आणि त्यातूनच हा फोन कॉल केल्याचे मांढरे यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.
मांढरे यांच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल मुंबईला कळविण्यात आला असून तेथील अधिकाऱ्यांचा एक चमू मांढरे यांची चौकशी करणार असल्याचे समजते.
---