नाराज टोकस, निरूपम यांना प्रदेश काँग्रेसच्या यादीत स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:09 AM2021-02-27T04:09:59+5:302021-02-27T04:09:59+5:30
नागपूर : प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणारे नाना पटोेले यांना पक्षांतर्गत नाराजीला सामोरे जावे लागू नये याची जाणीव ठेवत ...
नागपूर : प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणारे नाना पटोेले यांना पक्षांतर्गत नाराजीला सामोरे जावे लागू नये याची जाणीव ठेवत प्रदेश काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत नाराजांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद गमावल्याने नाराज असलेल्या चारूलता टोकस यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, तर मुंबई काँग्रेसमधील घडामोडीने दुखावलेले संजय निरूपम यांची प्रदेश संसदीय मंडळात नियुक्ती करण्यात आली आहे.
पटोेले यांच्या अध्यक्षपदाची घोषणा करताना ६ कार्याध्यक्ष, १० उपाध्यक्ष व ३७ सदस्यीय संसदीय मंडळाची घोषणा करण्यात आली होती. शुक्रवारी जारी झालेल्या दुसऱ्या यादीत नाना गावंडे, सचिन नाईक, संजय राठोड यांच्याह चारूलता टोकस या चार नव्या उपाध्यक्षांना स्थान देण्यात आले आहे. ‘मनरेगा’चे राष्ट्रीय परिषद सदस्य राहिलेले नाना गावंडे हे अशोक चव्हाण यांच्या कार्यकारिणीत प्रदेश सचिव होेते. त्यांनी विविध जिल्ह्यांत निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. पुसदचे सचिन नाईक हे अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये सचिव होेते; तर बुलडाण्याचे राठोड हे १५ वर्षांपूर्वी ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.
प्रदेश काँग्रेसच्या संसदीय मंडळात माजी मंत्री एकनाथ गायकवाड, माजी खासदार संजय निरूपम, जनार्धन चांदूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी यासंबंधीची यादी जाहीर केली आहे.